नेरळ : उल्हासनदी संवर्धनासाठी व्हाट्सएप ग्रुपचा पुढाकार

संतोष पेरणे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नेरळ, कर्जत परिसरातील तरुणांनी अनेक भागात जाऊन साठलेल्या जलपर्णी असलेल्या भागाची पाहणी केली. व त्यानुसार ही जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने या मोहिमेस सुरवात करण्यात आली.

नेरळ (जि. रायगड) : गेल्या दीड महिन्यापासून उल्हास नदी बचाव मोहीम असा व्हाट्सएप ग्रुप नेरळ, कर्जत परिसरातील तरुणांनी सुरू केला असून उल्हास नदी संवर्धनाविषयी चर्चा गेल्या महिनाभरापासून ग्रुपवर सुरू आहेत. काही भागात या मोहिमेला सुरवात करण्यात आली असून अनेक ठिकाणी नदी पत्रात वाहत आलेली आणि साठलेली जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे काही भागात नदीपात्र स्वच्छ झाल्याचे दिसत आहेत. तरुणांनी सुरू केलेल्या या नदी पात्र संवर्धनामुळे या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कर्जत, नेरळ भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीचा उगम लोणावळा भागातील राजमाची परिसरात होत असून येथील डोंगराळ भागातून वाहणारे पाणी येथून उल्हास नदीला येऊन मिळते. पुढे या नदीचे मात्र मोठं मोठे होत आहे. या उल्हास नदीत परिसरातील काही भागात सुरू असलेल्या नवनवीन बांधकाम व्यावसायिक तसेच शहरातील मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. ही जलपर्णी गेल्या दोन महिन्यापासून उल्हास नदी पत्रात वाहत येत आहे. आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे ना लक्ष प्रशासनाचे, ना लोकप्रतिनिधींचे. दोन महिन्यांपासून अनेक भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत, परंतू अनेक पाणी योजनांना फिल्टर पॅन्ट नसल्याने हे दूषित पाणी घरा-घरात जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकसभेची निवडणुकीचा माहोल असल्याने अनेक आदिवासी भागात, शहरी भागात नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे. ही आश्वासने फक्त निवडणुकीपुरतीच असतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून उल्हास नदीच्या काठावर असलेल्या गावांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. याकडे कुणाचे लक्ष नाही. यासाठी नेरळ परिसरातील तरुणांनी पुढाकार घेतला असून उल्हास नदी वाचविण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार काही भागात नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. वेळ मिळेल तसे तरुण वर्ग नदी स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. तसे नियोजन देखील त्यांनी केला आहे.

नेरळ, कर्जत परिसरातील तरुणांनी अनेक भागात जाऊन साठलेल्या जलपर्णी असलेल्या भागाची पाहणी केली. व त्यानुसार ही जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने या मोहिमेस सुरवात करण्यात आली असून ज्या ज्या गावाजवळ असलेल्या नदी पत्रात जलपर्णी, प्लॅस्टिक  नदी पत्रात साचले असल्यास तरुणांनी पुढाकार घेऊन दूषित पात्र स्वच्छ करावे असे आवाहन देखील उल्हास नदी बचाव मोहीम ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून कर्जत, नेरळ परिसरातील उल्हास नदी पत्रात जलपर्णी वाहत येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर नियोजन करण्यासाठी व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला असून नदी स्वच्छ करण्यासाठी नियोजन सुरू केले असून त्यानुसार काम सुरू आहे. दहिवली व काही भागात नदी पात्र स्वच्छ करण्यात आले असून पुढे ही मोहीम अशी सुरू राहणार आहे. यासाठी परिसरातील अनेक तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.
- केशव तरे, कार्यकर्ता

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The initiative of the Whatsapp Group to field upgrading in Ulhas River in Nerul