चिपळूण - फासकीत अडकलेल्या बिबट्याने सुटका करून घेतली आणि पुढे तासभर लोक सैरावैरा झाले. यामध्ये बघ्यांपैकी नऊजण जखमी झाले. काहींना बिबट्याच्या पंज्याचा फटका बसला, तर काहींना नखाचे ओरखडे. पळापळ झाल्यामुळे काहीजण पडले, ठेचकाळले ते वेगळेच. लोकांपासून सुटका करून घेतल्यावर फासकीने जखमी झालेला बिबट्या काही मिनिटे रस्त्यावर निवांत होता. त्याला पुन्हा पकडायला गेल्यावर मात्र एकाला जखमी करून तो पळून गेला.
बिबट्याचा हा थरार गाणेखडपोली येथे सुमारे तासभराहून अधिक काळ सुरू होता. फासकीतून सुटलेल्या बिबट्याने वन कर्मचार्यासह दहाजणांना प्रसाद दिला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गाणे खडपोली एमआयडीसी परिसरात लोकवस्तीच्या जवळच लावलेल्या फासकीमध्ये आज सकाळी 11 वाजता बिबट्या आढळून आला. रस्त्यापासून जवळच अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
वाहनांचा आवाज, गर्दी पाहून बिबट्या घाबरला. तेथे सुमारे शेकडाभर लोक जमा झाले होते. वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्याने फासकीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्या रस्त्यावर येत असल्याचे पाहिल्यानंतर ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली.
काहीजण रस्त्यावर दुचाकी उभी करून बिबट्याला पाहण्यासाठी शेतात गेले होते. बिबट्या पुढे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते दुचाकी रस्त्यावर सोडून सैरावैरा पळाले. या दरम्यान बिबट्याने मंगेश शिंदे, सुचित मोहिते, रवींद्र भाताडे, समीर गायकवाड, अमित गजमल आणि विकास पवार यांच्यासह 9 जणांना प्रसाद दिला. मंगेश शिंदे आणि अमित गजमल यांना गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत बिबट्याने रस्त्यावर येऊन दुचाकी लावलेल्या ठिकाणी ठाण मांडले.
तेव्हा घटनास्थळी दाखल झालेल्या वन कर्मचार्यांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचे पाठीमागील पाय पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना बिबट्याने वन कर्मचार्यांवरही हल्ला चढविला आणि तो जंगलाच्या दिशेने गेला. या हल्ल्यात उमेश अखाडे हे वन कर्मचारी जखमी झाले. त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात, तर इतरांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिंजर्यात बंद करून घेतले
बिबट्याने वन कर्मचार्यावर हल्ला चढविल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने बिबट्यासाठी आणलेल्या पिंजर्यात स्वतःला बंद करून घेतले. बिबट्या जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर तो पिंजर्यातून बाहेर आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.