कोकण किनारपट्टीवर सात ते आठ मिनी पर्ससीन नौकांची घुसखोरी, कुठे घडला हा प्रकार वाचा 

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 6 September 2020

अनधिकृतपणे मिनी पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या नौकांवर मोठ्या प्रमाणात परराज्यातील खलाशांचा वावर होता.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्‍यातील आचरा बंदरासमोर सात ते आठ मिनी पर्ससीननेट नौका साडेबारा वावाच्या आतमध्ये बेकायदेशीररित्या मासेमारी करत असल्याचे आज सकाळी गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांना दिसून आले. घुसखोरीमुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये संताप आहे. या प्रकरणी पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागाचे लक्ष वेधत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

दांडी, वायरी, दांडी आवारवाडी, तळाशील, धुरीवाडा येथील गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने मासेमारी करण्यासाठी आचरा व आजूबाजूच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारीहून परतत असताना सात ते आठ मिनी पर्ससीन नेट नौका साडेबारा वावाच्या आतमध्ये मासेमारी करत असल्याचे त्यांना दिसून आले. एक सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत साडेबारा वावाच्या बाहेर परवानाधारक पर्ससीन नेट नौकांना परवानगी असताना या नौका साडेबारा वावाच्या आतमध्ये मासेमारी कशी काय करू शकतात, असा सवाल पारंपरिक मच्छीमारांनी उपस्थित केला. दरम्यान, मिनी पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीवर मत्स्य विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी श्री. पराडकर यांनी केली आहे. 

श्री. पराडकर म्हणाले, ""राज्याच्या सागरी हद्दीतील मत्स्य साठ्यांवर स्थानिक क्रियाशील मच्छीमारांचाच अधिकार आहे आणि तसा कायदा शासनाने पारित करायला हवा. आज अनधिकृतपणे मिनी पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या नौकांवर मोठ्या प्रमाणात परराज्यातील खलाशांचा वावर होता. त्यामुळे या नौका स्थानिक होत्या की परराज्यातील याची चौकशी मत्स्य विभागाने करून त्याविरोधात कडक कारवाई करायला हवी. परराज्यातील खलाशांना मोकळीक मिळत असल्यानेच अनधिकृत मिनी पर्ससीन नेटची संख्या वाढत आहे. परराज्यातील खलाशांचा वावर असलेल्या अशा अनधिकृत मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने आजवर कडक कारवाई न केल्यानेच एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. तरी राज्य सरकारने अनधिकृत पर्ससीन नेट मासेमारीबरोबरच परराज्यातील खलाशांच्या वाढत्या अतिक्रमणास कायदेशीर आळा घालावा. अन्यथा स्थानिक पारंपरिक मच्छीमारांसमोरील मत्स्य दुष्काळाची समस्या कायम राहणार आहे.'' 

स्थानिक मच्छीमारांचा रोजगार परराज्यातील मासेमारी नौका आणि परराज्यातील खलाशी हिरावून नेत असतील तर शासनाने या गोष्टीची वेळीच गंभीर दखल घ्यायला हवी.
-महेंद्र पराडकर, पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The intrusion of seven to eight mini purseseen boats in konkan coast read where it happened