चाैपदरीकरणाने अनेकांच्या रोजगाराला भरणेत ब्रेक ! 

चाैपदरीकरणाने अनेकांच्या रोजगाराला भरणेत ब्रेक ! 

चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे सव्वाशेहून अधिक जणांचा रोजगार हिरावला आहे. दैनंदिन उलाढाल ठप्प झाल्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. 

मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात येणारा प्रवासी भरणेनाका येथे हमखास थांबतो. येथील टपरीवरचा चहा घेवून थकवा घालवून तो पुन्हा प्रवासाला लागतो. घरगुती सर्व प्रकारच्या वस्तू येथे उपलब्ध होतात. सामान्य लोकाची बाजारपेठ म्हणून भरणेनाक्‍याची ओळख आहे. भरणेनाका येथे रस्त्याच्या दुतर्फा छोटी मोठी दुकाने होती. दहा बाय दहाच्या गाळ्यात मेडीकल, बेकरी, कपड्याची दुकाने वसली होती. रस्त्यालगत हातगाड्या आणि पानटपऱ्या होत्या.

येथे हातगाडीवर आणि भाड्याच्या गाळ्यात किरकोळ वस्तू विकणारे दररोज पाचशे ते हजार रुपयाचा व्यवसाय करून कुटुंब चालवत होते. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणासाठी येथील दुकानदारांना दिवाळीत नोटीसा काढण्यात आल्या. अतिक्रमण तातडीने काढण्याची सूचना झाल्यामुळे पंधरा दिवसात सर्वांनी स्वखुशीने अतिक्रमण हटविले; मात्र सहा महिने झाले तरी चौपदरीकरणाचे काम सुरू न झाल्यामुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. येथील 90 टक्के व्यवहार सहा महिन्यापासून बंद आहे. एप्रिल व मे महिन्यात शिमगोत्सव, यात्रा आणि सुट्टीनिमित्त लाखो पर्यटक व चाकरमानी महामार्गाने जिल्ह्यात येतात. त्यामुळे हे दोन महिने येथील दुकानदारांसाठी सुगीचे असतात. चौपदरीकरणामुळे यावर्षीचा त्यांचा हंगाम वाया गेला आहे. 

रोज गोळा व्हायची 80 हजारांची पिग्मी 
सहकारी बॅंका व पतसंस्थांच्या प्रतिनिधींना किरकोळ दुकानदार 100 रुपयांपासून 500 रुपयापर्यंत दररोज पिग्मी द्यायचे. यातून सुमारे 70 ते 80 हजार रुपये दररोज गोळा व्हायचे. ही उलाढाल आता ठप्प झाली आहे. 

भरणे नाक्‍यात एक - दोन चहाच्या टपऱ्या सुरू आहेत. पण प्रवाशांना उन्हात उभे राहून चहा प्यावा लागतो. खाद्यपदार्थांवर धूळ उडत असल्यामुळे दुकानदार खाद्यपदार्थ झाकून ठेवतात. मात्र येथे काही मिळणार नाही, असा समज करून प्रवासी पुढे निघून जातात. शासनाने लवकरात लवकर महामार्गाचे काम सुरू करून ते पूर्ण करावे म्हणजे आम्हाला आमचा व्यवसाय मांडता येईल. 
- मनिषा शेलार,
भरणेनाका खेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com