मुंबई - गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पोलिसांच्या देखत घडला.

कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पोलिसांच्या देखत घडला.

आमदार वैभव नाईक, भाजपचे नेते संदेश पारकर, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त प्रकल्पग्रस्तांनी उपअभियंत्यांना कामावरून बाजूला करा, अशी मागणी लावून धरली. आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. त्यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण होते. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत केल्यानंतर महामार्गाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली.

महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीसह कणकवली तसेच जिल्ह्यातील महामार्गाची अडलेली कामे, मोबदला वाटप तसेच चुकून राहिलेले गट क्रमांक याबाबतची सगळी कामे तत्काळ केली जातील, असे आश्‍वासन महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी यावेळी दिले.
श्री. पारकर यांनी काही दिवस राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत मुद्दा लावून धरला होता. यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र कार्यकारी अभियंता बनगोसावी यांनी दोनदा तारखा आणि वेळ पुढे ढकलली. त्यामुळे संताप होता.

या पार्श्‍वभूमीवर कार्यकारी अभियंत्यांनी चर्चेसाठीची तारीख दिली होती. प्रांत कार्यालयात सकाळपासूनच शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते, नेते आणि प्रकल्पग्रस्त जमले होते. याच दरम्यान कार्यालयात कार्यकारी अभियंता पोचले. संतप्त जमावाने त्यांना घेराओ घातला. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून अडचणी निर्माण झाल्या, तेथे-तेथे  शेडेकर स्थानिक ग्रामस्थांना आश्‍वासने देत होते.

बऱ्याच ठिकाणी महामार्गाचे काम पूर्ण करून घेतले; मात्र दिलेले आश्वासन पाळले नाही. नेहमी गोड बोलून मालमत्ता काढून टाकून रस्ता तयार करणे, हीच त्यांची भूमिका असल्याचा आरोप करत जमावाने शेडेकर यांना अक्षरशः धक्काबुक्की केली आणि महामार्गाच्या कामातून यांना बाजूला करा; अन्यथा त्यांना कोणीतरी मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. अखेर पोलिस निरिक्षक कोळी यांनी मध्यस्थी करत जमावाला शांत केले. यानंतर पुढील चर्चेला सुरवात झाली.

प्रांत कार्यालयात तहसीलदार संजय पावस्कर यांच्यासह भूमी अभिलेख श्रीमती भोकटे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. चर्चेत महामार्गाच्या सध्याच्या अडचणी तातडीने सोडवतो आणि इतर कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करून देईन, असे आश्‍वासन बनगोसावी यांनी दिले. महामार्गाच्या दुसऱ्या अवार्डमधील एकशे दहा कोटींची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम आचारसंहितेनंतर मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

ज्या जमिनीचे गट क्रमांक चुकलेले आहेत, त्यांची पुन्हा मोजणी केली जाईल, नोटिसा पाठविल्या जातील, असे ते म्हणाले. जानवली येथे महामार्ग मोजणीसाठी वापरलेला नकाशा आणि सध्याचा नकाशा यांत मोठा फरक आहे. त्यामुळे संपत्तीत जागेपेक्षा अधिक जागा केसीसी कंपनीकडून घेतली जात आहे, असे रंजन राणे यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबतही ग्रामस्थांसह आपण पाहणी करू, असे आश्‍वासन बनगोसावी यांनी दिले.

वागदे येथील काही घरांकडे जाणारा बंद केलेला रस्ता तत्काळ खुला न झाल्यास आणि तेथील समस्या तातडीने न सोडविल्यास अधिकाऱ्यांना महामार्गाजवळ फिरू देणार नाही, असा इशारा भाजपच्या महिला नेत्या प्रज्ञा ढवण यांनी दिला. त्यांनी शेडेकर आणि दिलीप बिल्डकॉमच्या रवी कुमार यांनाही धारेवर धरले.

तर टोलनाके उद्‌ध्वस्त करू
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्हावासीयांनी मोठा त्याग केलेला आहे. त्यामुळे ओसरगाव आणि बांदा येथे पार्क असलेल्या टोल नाक्‍यावर एम एच ०७ या सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्या टोल भरणार नाहीत, असा इशाराही आज देण्यात आला. टोल लावला गेला तर कोल्हापूरप्रमाणे टोलनाके उद्‌ध्वस्त करू, असा दमही आमदार नाईक आणि पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिलेला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai Goa Highway four track