महामार्गचाैपदरीकरण : अस्तित्वाला धक्‍क्‍याची निवळीवासीयांना भीती 

राजेश शेळके
शुक्रवार, 17 मे 2019

रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे.

रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा. चौपदरीकरणात गटारे, मोऱ्यांचे पाणी कुठे निघणार, निवळी शाळेत पाणी घुसणार का? खोदाईतील माती बावनदीच्या बाजूला टाकली आहे. ती येऊन नदीपात्र भरणार नाही ना? अशा कितीतरी प्रश्‍नांमुळे निवळी-रावणंगवाडीतील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे या चिंतेने त्यांची झोप उडाली आहे. 

संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्‍याच्या सीमा रेषा म्हणजे बावनदी. सध्या बावनदीवर मोठा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील पिलरच्या कामाने वेग घेतला आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात डोंगर कापून मूळ रस्त्याशी समांतर रस्ता करण्यात येत आहे. एमईपी कंपनीकडे याचा ठेका आहे. काही भागात कामाने गती घेतली आहे.

याच कामाच्या क्षेत्रात हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये निवळी रावणंगवाडी येते. साधारण 730 मतदार आणि 300 घरे असलेली ही वाडी. शेती हा मुख्य व्यवसाय असून त्याला पूरक असे जोड धंदे इतर व्यवसाय करून हे लोक आपला उदरनिर्वाह करतात. 

चौपदरीकरणाच्या कामाला त्यांचा विरोध नाही; मात्र त्यातून आपले लोकजीवन उद्‌ध्वस्त होऊ नये इतकीच माफक अपेक्षा ते व्यक्‍त करतात. याबाबत तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता दत्ताराम रावणांग, सोनू रावणांग, प्रकाश रावणांग, संतोष, सीताराम रावणांग आदींनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, ""रस्त्यालगत आमची निवळी प्राथमिक शाळा आहे. चौपदरीकरणात रस्त्याच्या बाजूचा नाला बुजला तर वरून येणारे सर्व पाणी रस्त्यावर येऊन शाळेत घुसण्याची शक्‍यता आहे. 300 कुटुंबांचा गाव आहे. आमची अनेकांची शेती रस्त्याच्या वरच्या बाजूला आहे. गुरेदेखील त्या भागातच चरविण्यासाठी नेतो. चौपदरीकरणात त्या भागातील आमची वहिवाटच संपणार आहे. आम्हाला वरती जाण्यास मार्गच राहणार नाही. रस्त्यावरून जाणे धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे मार्ग ओलांडण्यासाठी आम्हाला भुयारी मार्ग करून द्यावा. 

भरावाचा धोका होणे शक्‍य 
डोंगर कापून निघालेली माती भराव म्हणून बावनदी पात्राच्या बाजूला टाकली जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र कमी होऊन माती शेतजमिनीत जात आहे. त्याचाही बंदोबस्त तातडीने करण्याची आवश्‍यकता आहे. या मातीमुळे नदीचे पात्र बदलण्याचा धोका आहे तसेच पाणी घरांमध्येही घुसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

महामार्गाच्या चौपदरीकरणाला आमचा विरोध नाही. मात्र स्थानिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत. त्याच समस्यांचा विचार करण्यासाठी शासकीय स्तरावरील एकही अधिकारी पुढे येत नाही. आम्ही या मांडायच्या कुठे? 
- दत्ताराम रावणांग,
स्थानिक ग्रामस्थ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai Goa Highway four track Ground report