अर्ध्या पोटावर, काम पु्र्णवेळ अन् वेतन मात्र अर्धेच ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची तरतूद असतानाही ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ आली

साडवली (रत्नागिरी) : कोरोना काळात वाढलेली महागाई आणि त्यात गेले सात महिने पूर्णवेळ नोकरी करूनही अर्धेच वेतन मिळत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची कैफियत साडवली येथील आयटीआयच्या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता पैशांची तरतूद असतानाही ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा - शिवसेना आमदार जाधव यांच्या प्रश्नाला ठेकेदार मात्र निरुत्तर
 

गेले काही महिने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक महामारीच्या संकटातून साऱ्यांनाच जावे लागत आहे. मातृमंदिर संचलित इंदिराबाई महादेव बेहरे आयटीआय, साडवली येथील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात पूर्णवेळ काम केले, असा दावा करून ३० टक्‍के, ५० टक्‍के उपस्थिती ठेवणे गरजेचे असताना कोरोना कालावधीत कर्मचाऱ्यांना १०० टक्‍के उपस्थित राहण्यास सांगितले, अशी कैफियत निवेदनाद्वारे साडवली आयटीआयच्या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. तसेच कर्मचारी परजिल्ह्यातील असल्यामुळे येऊ शकले नाहीत. अशांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली. 

कर्मचाऱ्यांची १०० टक्‍के हजेरी आहे. प्रशिक्षणार्थीना त्यानी ऑनलाइन प्रशिक्षण दिले असूनही संस्था एप्रिल २०२० ते ऑक्‍टोबर २०२० पर्यंतचे वेतन ५० टक्‍केच घ्या, अशी सक्‍ती आमच्यावरती करीत आहे. आम्हाला १०० टक्‍के उपस्थितीनुसार पूर्ण वेतन मिळणे गरजेचे आहे. गेली सहा वर्षे कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची वेतनवाढ झालेली नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी इन्क्रिमेंट वाढीबाबत अर्ज दिला असता संस्थेने मात्र अन्यायकारक मनमानी वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांच्या माथी मारली असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे. देण्यात आलेली ही वेतनश्रेणी देखील आपल्याला मान्य नाही असेही निवेदनात म्हटले आहे. प्रसिद्धिस दिलेल्या या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा -  सिंधुदुर्गात अवैध व्यवसायात होतीये वाढ ; पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह -

"कोरोना काळात देवरुख मातृमंदिर संचलित इंदिरा बेहेरे आयटीआय प्रशिक्षण वर्गासाठी शासन प्रणालीप्रमाणेच शिक्षण दिले गेले. यासाठी कर्मचारी वर्गाला ५० टक्के वेतन देण्याचे संचालक मंडळाने ठरविले. मात्र, कर्मचाऱ्यांना हे वेतन कमी वाटत आहे. कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाला सहकार्य करावे, अशी आमची इच्छा आहे. या काळात अनेक ठिकाणी कर्मचारी कपात झाली. मात्र, आम्ही तो निर्णय घेतला नाही."

- अभिजित हेगशेट्ये, कार्योपाध्यक्ष, मातृमंदिर

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI employee received only half payment on diwali vacation but working full time in ratnagiri