esakal | `या` किल्ल्याची तटबंदी ढासळतेय, लक्ष देण्याची शिवप्रेमींची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Jaigad Fort Security Wall Damaged Ratnagiri Marathi News

मुख्य तटबंदीसह आधार असलेली बाजूची तटबंदी यंदाच्या पावसाळ्यात ढासळलीय. या ऐतिहासिक वास्तूचे शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने संरक्षण करून मूळ स्वरूपात जतन करावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीय. 

`या` किल्ल्याची तटबंदी ढासळतेय, लक्ष देण्याची शिवप्रेमींची मागणी

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - तालुक्‍यातील जयगड किल्ला हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे; मात्र शेकडो वर्षे सर्व ऋतुंशी झुंज देणाऱ्या या किल्ल्याची तटबंदी आता ढासळू लागली आहे.

मुख्य तटबंदीसह आधार असलेली बाजूची तटबंदी यंदाच्या पावसाळ्यात ढासळलीय. या ऐतिहासिक वास्तूचे शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने संरक्षण करून मूळ स्वरूपात जतन करावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीय. 

जयगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारे अनेक संदर्भ आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. 1578-80च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे 1695 च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. 1818 च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. किल्ल्याला दोन बुरुजांमध्ये लपवलेला दरवाजा आहे.

प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना असावा, अशी त्याची रचना आहे. दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग असे मार्ग केलेले आहेत. वाड्याशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे; मात्र तो झाडी झुडपांनी पूर्णपणे झाकला गेलाय. बाजूलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलिदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. गडावरून समुद्राकडील देखावा उत्तम दिसतो. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. ऐतिहासिक वारसा असलेल्या या जयगड किल्ल्याची तटबंदी ढासळत चालली आहे. तीन ठिकाणी तटबंदी ढासळल्याने किल्ल्याला धोका निर्माण झालाय. 

जानेवारी महिन्यात दरवर्षी आम्ही राजे ग्रुपकडून जयगडची साफसफाई करायचो. तटबंदी ढासळताना मनाला फार वेदना होत आहेत. महाराजांच्या नावाने मत मागणारे राजकारणी इकडे कधी लक्ष देणार का. 
- वैभव घाग, 
महाराष्ट्र समविचारी मंच 

संपादन - राजेंद्र कृष्णराव घोरपडे

loading image