
यातील 1675 कामे पूर्ण झाली आहेत तर 35 कोटी 44 लाख रुपये निधी खर्च झाला आहे; मात्र यातील 2016-17 मधील सिंधुदुर्गातील 18 कामांत अनियमितता असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात नमूद आहे.
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्याच्या मागील सरकारने 2020 पर्यंत राज्यात पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानमधून 2015 ते 20 या पाच वर्षात 136 गावांची निवड करण्यात आली. पहिल्या चार वर्षांतील 111 गावांसाठी 46 कोटी 33 लाख रूपये खर्चाचा आराखडा तर 1792 कामांची निवड केली होती. यातील 1675 कामे पूर्ण झाली आहेत तर 35 कोटी 44 लाख रुपये निधी खर्च झाला आहे; मात्र यातील 2016-17 मधील सिंधुदुर्गातील 18 कामांत अनियमितता असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात नमूद आहे.
मागील देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेवर येताच राज्यातील पाण्याची भीषणता संपविण्यासाठी 2020 पर्यंत पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध करण्यासाठी "जलयुक्त शिवार अभियान' सुरु केले होते. या अभियान अंतर्गत जलसंधारण व पाणलोटची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. राज्य कृषी विभाग अंमलबजावणी यंत्रणा असून कृषी, वन, सामाजिक वनीकरण, जलसंधारण, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा या विभागामार्फत विविध कामे करण्यात आली. यासाठी गाववार कृती आराखडा तयार करण्यात आला. जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत गावांची निवड करण्यात येत होती. गाववार कामांची संख्या व त्याला लागणारा निधी याचा जिल्हास्तरावर एकत्रित आराखडा करून त्यासाठी निधी तरतूद करण्यात येत होता. काही निधी थेट शासनाने दिला. काही निधी सामाजिक संस्थानी दिला तर काही निधी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करण्यात आला.
पहिल्याच वर्षी 35 गावांची निवड
जलयुक्त शिवार अभियान 2015-16 या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आले. पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील 35 गावांची निवड झाली. यासाठी 597 कामांचा 22 कोटी 60 लाख रूपये खर्चाचा आराखडा तयार केला. यातील 490 कामे पूर्ण करण्यास प्रशासनाला यश आले. यासाठी 17 कोटी 49 लाख रूपये निधी खर्च झाला. देवगड तालुक्यातील हडपीड, वाघीवरे, शिरवली, कोटकामते, कुवळे. वैभववाडीतील नाधवडे. कणकवलीतील हरकुळ खुर्द, करंजे, कोळोशी, ओझरम, नागसावंतवाडी. मालवणातील कुणकवळे, चुनवरे, चिंदर, कर्लाचाव्हाळ. कुडाळातील तुळसुली तर्फ माणगाव, हिर्लोक, आंदुर्ले, शिवापुर, भडगांव बुद्रुक, गोठोस, आवळेगाव. वेंगुर्लेतील कोचरा, आरवली. सावंतवाडीतील सोनुर्ली, केसरी, भालावल, बावळाट, निरवडे, तांबोळी. दोडामार्गातील तळकट, फुकेरी, पाळये, कुंभवडे, फोंडये या गावांची निवड झाली होती.
दुसऱ्या वर्षी 8 कोटी 69 लाख खर्च
वर्ष 2016-17 या दुसऱ्या वर्षासाठी 23 गावांची निवड केली होती. यासाठी 272 कामांसाठी 10 कोटी 84 लाखांचा आराखडा तयार केला होता. यातील 238 कामे पूर्ण होत 8 कोटी 69 लाख एवढा निधी खर्च झाला. या वर्षासाठी देवगड तालुक्यातील वळीवंडे, शेवरे. वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण. कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे, धारेश्वर-कासार्डे. मालवण तालुक्यातील वायंगणी, वराड, पोईप, मसुरे. कुडाळ तालुक्यातील किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारूर, साळगाव. वेंगुर्ले तालुक्यातील रावदस-कुशेवाडा, पेंडुर. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, गेळे, नेमळे, माजगाव. दोडामार्ग तालुक्यातील माटणे, वझरे या गावांची निवड केली होती.
2017-18 मध्ये 682 कामे पूर्ण
2017-18 योजनेच्या तिसऱ्या वर्षी 37 गावांची निवड केली होती. यासाठी 708 कामांचा 8 कोटी 93 लाख रूपये खर्चाचा आराखडा तयार केला होता. यातील 682 कामे पूर्ण होवून 7 कोटी 21 लाख रूपये खर्च केला आहे. या वर्षासाठी देवगड तालुक्यातील नाडण, धालवली, सौंदाळे. वैभववाडी तालुक्यातील नावळे, पालांडेवाडी. कणकवली तालुक्यातील कळसुली, हरकुळ बुद्रुक, नाटळ, भिरवंडे, ओसरगाव, हळवल. मालवण तालुक्यातील किर्लोस, असगणी, कुंभारमाठ, तिरवडे, साळेल. कुडाळ तालुक्यातील आंजीवडे, पोखरण, कुसबे, पिंगुळी, गिरगाव, कुसगाव, नेरूर तफ हवेली, अणाव. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली, भंडारवाडा, गवाण. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, सावरवाड, बांदा, चौकुळ, कोनशी, दाभोळ. दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे-आयनोडे, घाटीवडे, खानयाळे, झोळबेची निवड केली होती.
2018-19 मध्ये केवळ 2 कोटी खर्च
2018-19 चौथ्या वर्षी 16 गावांची निवड केली होती. 225 कामांचा 5 कोटी 96 लाख खर्चाचा आराखडा तयार केला होता. यातील आतापर्यंत केवळ 165 कामे पूर्ण झाली असून 2 कोटी 5 लाख एवढाच निधी खर्च झाला आहे. अजुन कामे सुरु असून शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने 31 मार्च 2020 पर्यंत दुसरी व अंतिम मुदतवाढ दिली आहे. या वर्षासाठी वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, तिरवडे तर्फ सौंदाळे, ऊपळे, मौदे, वेंगसर, ऐनारी, भुईबावडा, रिंगेवाडी. कणकवली तालुक्यातील फोंडा, बोर्डवे. मालवण तालुक्यातील त्रिंबक. कुडाळ तालुक्यातील तेंडोली, झाराप, नेरूर कर्याद नारूर. वेंगुर्ले तालुक्यातील श्रीरामवाडी. दोडामार्ग तालुक्यातील परमे या गावांची निवड केली होती.
पाचव्या वर्षी केवळ गावांची निवड
या 2019-20 या पाचव्या वर्षी जिल्ह्यातील 25 गावांची निवड केवळ जिल्हा निवड समितीने केली. त्याला शासनाने मंजूरी दिली नाहीच. तसेच गाववार कामे व निधी खर्चाचे आराखडे सुद्धा बनविण्यात आले नाहीत. या वर्षासाठी देवगड तालुक्यातील मुटाट, पोयरे, आरे. वैभववाडी तालुक्यातील नानीवडे, डिगशी, सडुरे, करूळ. कणकवली तालुक्यातील दारिस्ते, शिवडाव, कळसुली-लिंगेश्वरनगर, कळसुली-उल्हासनगर, कळसुली-पिंपळेश्वरनगर. मालवण तालुक्यातील नांदरुख, वडाचापाट, वेरळ, मर्डे, ओवळीये. कुडाळ तालुक्यातील कुंदे, हुमरस, हुमरमळा (वालावल). वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी, मातोंड. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, डिंगणे. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले या गावांची निवड झाली होती; पण शासनाने मंजूरी दिली नसल्याने हे गाव पाणीदार झालेच नाहीत.
पुढील सभेत अहवाल
2016-17 दुसऱ्या वर्षासाठी 23 गावांची निवड केली होती. यासाठी 272 कामांसाठी 10 कोटी 84 लाखांचा आराखडा तयार केला होता. यातील 238 कामे पूर्ण होत 8 कोटी 69 लाख एवढा निधी खर्च झाला; मात्र यातील 18 कामांत अनियमितता असल्याचे पुढे आले. मागील जिल्हा नियोजन समितीत चौकशी समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले होते. या समितीने 28 जानेवारीला झालेल्या सभेत अहवाल सादर केला होता. त्यात हे स्पष्ट झाले. दरम्यान, याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
जिल्हा नियोजन समिती सभेत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी समिती नेमून अहवाल तयार केला आहे. 2016 मधील 18 कामांत अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले; मात्र याबाबत समिती सदस्यांना सभेपूर्वी अहवाल न दिल्याने तो अहवाल द्यावा. हा विषय पुढील सभेत ठेवावा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
- एस. एम. म्हेत्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सिंधूदुर्ग
संपादन - राहुल पाटील