कणकवली लाॅकडाउनच, शासकीय कार्यालये मात्र सुरू 

तुषार सावंत
Wednesday, 23 September 2020

शहराबरोबर लगतच्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरात आज तिसऱ्या दिवशीही जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला. तर सर्व मेडिकल दुकानांसह बॅंका, रेशन दुकाने आणि शासकीय कार्यालये सुरू होती. आज दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिक देखील घराबाहेर पडले नव्हते. शहराबरोबर लगतच्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 या दरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात आहे. यात पहिल्या दिवशी मेडिकलसह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी मेडिकल दुकाने आणि काही प्रमाणात रेशन दुकाने सुरू झाली होती.

आज तिसऱ्या दिवशी पहाटेपासूनच पावसाची संततधार असल्याने कणकवली शहरासह तालुक्‍यातील जनजीवन ठप्प होते. महामार्गावरील वर्दळ देखील थंडावली होती. दुपारी चार नंतर मात्र शहरात तसेच महामार्गावर वाहनांची ये-जा सुरू होती. तसेच शासकीय कार्यालये आणि बॅंकांमध्येही नियमित कामकाज सुरू होते. 
 
आणखी पाच दिवस 
शहरातील सर्व संस्था, व्यापारी बांधव आणि शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. कणकवलीकरांनी गेले तीन दिवस जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. असेच सहकार्य पुढील पाच दिवस ठेवावे जेणेकरून कोरोनाची साखळी तोडणे शक्‍य होईल, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kankavali also closed on the third day