सहकाराच्या लढाईत कोणाची बाजी?

कणकवली तालुका; ३६ सोसायट्या, शिवसेना-भाजपमध्येच संघर्ष
shiv sena bjp
shiv sena bjpsakal

कणकवली : तालुक्यातील ३७ विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुका सुरू असून, या संस्थांवर आपल्या पॅनेलची सत्ता येण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे बहुतांश सेवा संस्थांच्या निवडणुका रंगतदार होत आहेत. सद्यस्थितीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने बहुतांश सेवा संस्थांवर कब्जा मिळविला. सहकाराच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या तालुक्यात सुरू आहे. यात २० संस्थांच्या निवडणुका झाल्या असून, १६ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सहकाराच्या या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भाजपप्रणित सिद्धीविनायक पॅनेलने बहुमत मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने तालुकास्तरावरील गावागावातील विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे. बहुतांशी गावांमध्ये विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुका होत आहेत. काही संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

यापूर्वी बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप सुरू केल्यानंतर त्या त्या पक्षाच्या पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुका रंगतदार बनू लागल्या आहेत. तालुक्‍यात ३७ विविध कार्यकारी सेवा संस्था आहेत. या संस्थामधून जिल्हा बँकेचा एक संचालक निवडून दिला जातो. जिल्हा बँकेची मागील निवडणूक राज्यभरात गाजली होती. यावेळी प्रचारादरम्यान आरोप- प्रत्यारोप झाले. कणकवली मतदारसंघातील ३७ विविध कार्यकारी संस्थांमधील दोन संस्थांचा निवडणूक मतदानाचा हक्क बाद ठरविला होता.

यंदा तरंदळे संस्था वगळत ३६ विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. यातील खारेपाटण, तळेरे, वाघेरी, घोणसरी, लोरे, नांदगाव, असलदे, कोळोशी, बिडवाडी, जानवली, कलमठ, कणकवली, वरवडे, ओसरगाव, हळवल, कसवण- तळवडे, शिवडाव, आयनल, नाटळ, आणि कळसुली अशा २० संस्थाच्या निवडणुका झाल्या आहेत. येत्या काळात शेर्पे, कासार्डे, फोंडाघाट, करूळ, साकेडी, सातरल-कासरल, शिरवल, दारिस्ते, नरडवे, दिगवळे,सांगवे, भिरवंडे, हरकुळ बुद्रुक, हरकुळखुर्द, नागवे, आणि बार्डवे अशा १६ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

शिवसेनेला यश

खारेपाटण, तळेरे, लोरे, वरवडे, कसवण-तळवडे, शिवडाव, नाटळ या सात संस्थांवर भाजप पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला असून, वाघेरी, घोणसरी, नांदगाव, कलमठ, ओसरगाव, हळवल, आयनल, कळसुली या आठ संस्थांवर शिवसेना पॅनेलने वर्चस्व राखले आहे. तर असलदे, कोळोशी, बिडवाडी, जानवली, कणकवली या पाच संस्थांवर गाव पॅनेलने सत्ता राखली आहे.

बिनविरोध निवडणूक फायद्याची

सहकारातील निवडणुका यापूर्वी बिनविरोध होत होत्या. नांदगाव संस्थेची ७८ वर्षांत सर्व जांगासाठी प्रथमच निवडणूक झाली. या निवडणुकांतील संस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. निवडणुकांचा सगळा खर्च संस्थेच्या खात्यातून होतो. निवडणूक झाल्यास प्रतीसभासद १४४ रुपये सहकार खात्याकडे भरावे लागतात. त्यामुळे ५०० पेक्षा अधिक सभासद असलेल्या संस्थेला एक लाखापेक्षा अधिक रक्कम निवडणुकांसाठी खर्च करावी लागत आहे.

हरकुळ खुर्दमध्ये तीन अपत्यांचा मुद्दा

सहकारी संस्था निवडणुकीत तीन अपत्यांचा मुद्दा कळीचा ठरला आहे. हरकुळ खुर्द संस्थेच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना तीन अपत्ये असल्याची तक्रार होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती फेटाळली. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. तालुक्यात असा पहिलाच प्रकार घडला आहे.

निवडणुका एप्रिल-मेमध्येच

शेर्पे, कासार्डे, फोंडाघाट, करूळ, साकेडी, सातरल-कासरल, शिरवल, दारिस्ते, नरडवे, दिगवळे, सांगवे, भिरवंडे, हरकुळ बुद्रुक, हरकुळ खुर्द, नागवे आणि बार्डवे अशा १६ संस्थांच्या निवडणुका एप्रिल-मेमध्येच पूर्ण होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com