कणकवली नगरपंचायतीची फसवणूक; 'त्या' भामट्याच्या कारनाम्यांची यादी मोठी

कणकवली नगरपंचायतीची फसवणूक; 'त्या' भामट्याच्या कारनाम्यांची यादी मोठी

कणकवली - इंडियन ऑईल कंपनीकडून 95 लाखांचा निधी मिळवून देतो, असे सांगून अनिरुद्ध टेमकर याने कणकवली नगरपंचायतीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यापूर्वी त्याने नगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडूनही लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी टेमकर याच्या विरोधात कणकवली पोलिसात फिर्याद दाखल केली जाणार आहे. 

इंडियन ऑईल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अनिरुद्ध टेमकर-पाटील याने 14 जुलैला कणकवली नगरपंचायतीमध्ये येऊन नगराध्यक्षांची भेट घेतली होती. यावेळी त्याने इंडियन ऑईलकडून नगरपंचायतीला 95 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्याअनुषंगाने कामाचे प्रस्ताव पाठवणे तसेच नगरपंचायत सभेची मंजुरी आवश्‍यक असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर कणकवली नगरपंचायतीच्या इ-मेल अकाऊंटवर इंडियन ऑईल कंपनीने 95 लाख रुपये मंजूर झाल्याचा इ-मेल केला असल्याचीही माहिती दिली होती. 

नगरपंचायत प्रशासनाच्या इमेलवर 95 लाख रुपये मंजूर झाल्याचा मेल आला असल्याने नगरपंचायतीची विशेष सभा तातडीने बोलावण्यात आली. यात इंडियन ऑईलच्या सीएसआर फंडातून होणाऱ्या 95 लाखांच्या कामांना मंजुरी देण्याचा ठराव घेण्यात आला; मात्र नंतरच्या कालावधीत इंडियन ऑईल कंपनीकडून आलेला मेल बनावट असल्याची बाब नगरपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी अनिरुद्ध टेमकर-पाटील याच्यावर पाळत ठेवली होती; मात्र ही बाब टेमकरच्या लक्षात येताच त्याने मोबाईल बंद केला होता. तसेच पुन्हा तो कणकवलीत फिरकला नव्हता. 

टेमकरने डिसेंबर 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष कोट्यातून तुम्हाला कामे मिळवून देतो, असे आमिष नगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना दाखवले होते. गावच्या विकासासाठी पैसे मिळावेत यासाठी ग्रामपंचायतींचे पदाधिकारी प्रयत्नशील असतात. हीच मानसिकता ओळखून टेमकरने नगर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची भेट घेतली होती. यावेळी त्याने तेथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना थेट ग्रामविकास मंत्रालय तसेच इंडियन ऑईल कंपनीकडून सीएसआर फंड मिळवून दिल्याचा बनाव रचला होता. मुख्यमंत्री फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्यासमवेतचे फोटोदेखील त्याने दाखविल्याने अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. फंड मिळविण्यासाठी मध्यस्थांना काही पैसे द्यावे लागतात असे सांगून त्याने नगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून लाखो रुपये उकळले होते. काही ग्रामपंचायतींकडून ऑनलाईन पैसे भरून घेतले होते. टेमकर-पाटीलकडून पैशाची मागणी वाढल्यानंतर अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना संशय आला. तसेच आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो त्या भागातून पसार झाला होता. 

त्याने कणकवली नगरपंचायत पदाधिकाऱ्यांकडेही 95 लाखांचा निधी मिळण्यासाठी 3 हजार 600 रुपये ऑनलाईन भरणा करण्याची मागणी केली होती. प्रभागात होणाऱ्या विकासकामांमध्ये आपली टक्‍केवारी असेल अशी अट घातली होती. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याची बाब नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांच्या लक्षात येताच त्यांनी टेमकर-पाटील याच्याशी गोड बोलून कणकवलीत येण्यासाठी आग्रह धरला होता; मात्र आपण करत असलेली फसवणूक उघड होणार याचा अंदाज आल्याने टेमकर-पाटील याने मोबाईल स्वीच ऑफ करून कणकवलीतून गाशा गुंडाळला; मात्र बनावट मेल आयडी तयार करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उद्या (ता.3) कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. 

कंपनी अध्यक्षांच्या नावाने पत्र 
नगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून त्या गावातील शाळांच्या भव्य इमारती, कचरा प्रक्रिया प्रकल्प, पाणी फिल्टर योजना अशांसाठी इंडियन ऑईल कंपनी कोट्यवधी रुपये देते असे सांगून कंपनीचे अध्यक्ष भगत यांच्या नावाने टेमकर-पाटील पत्र लिहून घेत असे. नगरपंचायतींना पाठविलेल्या मेलमध्ये शाळांना बेंचेस, मैला वाहून नेणारी गाडी, घंटा गाड्या, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सोलर सिस्टीम आदींची कामे होणार असल्याचा उल्लेख टेमकर-पाटील याने केला होता. 

कणकवली नगरपंचायतीची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला त्यावेळी मुख्याधिकारी रजेवर होते. नंतर त्यांची बदली झाली. नवनियुक्‍त मुख्याधिकारी अद्यापही हजर झालेले नाहीत. सध्या मालवणचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे प्रभार आहे. ते उद्या (ता.3) कणकवलीत आल्यानंतर टेमकर विरोधात तक्रार दाखल करणार आहोत. 
- समीर नलावडे,
नगराध्यक्ष, कणकवली  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com