

कणकवली (सिंधुदुर्ग) - भाजी मार्केटची उभारणी करणाऱ्या विकासकाने चुकीचा प्लॅन सादर करून अग्निशमन दाखला मिळवला आणि हा दाखला सादर करून नगरपंचायतीची फसवणूक केली, असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज नगरपंचायत सभेत केला. या मुद्दयावर जोरदार सत्ताधारी-विरोधकांत जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर कणकवली नगरपंचायतीच्या प्रस्तावित भाजी मार्केटची पाहणी मुख्याधिकारी तसेच जिल्हा नगररचना अधिकाऱ्यांसमवेत सर्व नगरसेवकांनी करण्याचे ठरले. या समितीच्या अहवालानंतरच भाजी मार्केट उभारणीबाबतचा निर्णय घेण्याचे आज नगरपंचायत सभेत निश्चित करण्यात आले.
येथील नगरपंचायतीच्या सभेत भाजी मार्केटचा मुद्दा गाजला. नगराध्यक्ष नलावडे यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना नगरपंचायतीशी करार करून देखील संबंधित विकासकाने गेल्या तीन वर्षात भाजी मार्केटची इमारत पूर्ण केलेली नाही. मूळ प्लॅनऐवजी दुसराच प्लॅन तयार करून या विकासकाने अग्निशमन दाखला मिळवला आणि तो सादर करून नगरपंचायतीचीही केल्याचा आरोप केला. जोपर्यंत शासनाचे सर्व नियम, निकष, परवानग्या यांची पूर्तता होत नाही तोवर भाजी मार्केट उभारणीबाबत विकासकाशी नव्याने करार करणार नसल्याचीही भूमिका त्यांनी मांडली.
या चर्चेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांच्यासह अभिजित मुसळे, अबिद नाईक, मेघा गांगण, कविता राणे, उर्मी जाधव, ऍड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, संजय कामतेकर आदींनी सहभाग घेतला.
शहरात तेलीआळी डीपी रोड आणि राष्ट्रीय महामार्ग यादरम्यानची जागा भाजी मार्केटसाठी आरक्षित आहे. या आरक्षित जागेपैकी 40 टक्के क्षेत्रात नगरपंचायतीला भाजी मार्केट बांधून देण्याचा करार संबधित विकासकाने ऑक्टोबर 2017 मध्ये नगरपंचायतीशी केला होता. हा करार करताना दोन वर्षात भाजी मार्केटची इमारत बांधून ती नगरपंचायतीकडे जागेसह हस्तांतरण करण्याचा करार करण्यात आला होता. जर दोन वर्षात हे मार्केट पूर्ण न झाल्यास त्याबाबतचा पुढील निर्णय नगरपंचायतीच्या सभेत घेण्याबाबतही या करारात अट घालण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी सभेत दिली.
संबंधिताने एक वर्षाच्या वाढीव मुदतीत ऑक्टोबर 2020 पर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते; मात्र अजूनही भाजी मार्केट बांधून ते नगरपंचायतीकडे हस्तांतरण झालेले नाही. मंजूर प्लॅनप्रमाणे या भाजी मार्केटकडे जाण्यासाठीचा 6 मिटर रस्ता सोडण्यात आलेला नाही. चुकीचा प्लॅन सादर करून या इमारतीसाठी अग्निशमन परवानगी घेण्यात आली.
या इमारतीसाठी स्वतंत्र सातबारा देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजी मार्केटबाबत काय करायचे याचा निर्णय सभागृहाने घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले. शहरात भाजी मार्केट व्हायलाच हवे. त्यामुळे संपूर्ण आरक्षित जागा नगरपंचायतीने भूसंपादन करून ताब्यात घ्यावी. भाजी मार्केट उभारणीसाठी आम्ही आमच्या नेत्यांकडून निधी आणू असा मुद्दा पारकर यांनी मांडला.
इमारत पाहणीचा निर्णय
भाजी मार्केटकडे जाण्यासाठी 12 मिटरचा स्वतंत्र रस्ता, सातबारा स्वतंत्र करणे आदी कामे झाल्याशिवाय भाजीमार्केटला सभागृहाने परवानगी देऊ नये, अशी भूमिका विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांनी मांडली. मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी देखील भाजीमार्केटबाबत वस्तुस्थिती पाहणी करून त्यावर नगररचना विभागाचा अभिप्राय घ्यावा आणि नंतरच मार्केट उभारणीबाबत सभागृहाने निर्णय घ्यावा, असे आपले मत मांडले. यानंतर सर्वानुमते पुढील काळात नगररचना विभागाचे अधिकारी, मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवकांनी भाजी मार्केट इमारतीची पाहाणी करण्याचे ठरविण्यात आले.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.