कणकवली उड्डाण पुलावरील बॅरिकेडचे अडथळे दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

barriers

कणकवली उड्डाण पुलावरील बॅरिकेडचे अडथळे दूर

कणकवली : येथील उड्डाण पुलावरील सिमेंट बॅरिकेडचे अडथळे हटविण्याची कार्यवाही महामार्ग ठेकेदाराने सुरू केली. चार दिवसांपूर्वी याच सिमेंट बॅरिकेडला धडकून दुचाकीवरील दोघा तरूणांचा मृत्‍यू झाला होता. यानंतर लोकप्रतिनिधींसह प्रशासन खडबडून जागे झाले. त्‍यानंतर हे बॅरिकेड हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. शहरालगतच्या गडनदी ते गोपुरी आश्रम या दरम्‍यानची एक मार्गिका अजूनही अपूर्ण असल्‍याने याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली उड्डाण पुलावरील काही भाग गेली दोन वर्षे खचत आहे. यंदा मे महिन्यात या खचलेल्‍या भागाची डागडुजी करण्यात आली. मात्र, या डागडुजीनंतर ही उड्डाण पुलावर सिमेंटचे बॅरिकेड्‌च कायम ठेवण्यात आले होते. धुवांवार पाऊस, रात्रीची वेळ आणि उड्डाण पुलावरील पथदीप बंद असल्याने ७ जुलैच्या मध्यरात्री तळेरे ते मालवण असा प्रवास करणारे दुचाकीवरील दोघे युवक या सिमेंट बॅरिकेड्‌ला धडकले होते.

या धडकेत दोघांचा मृत्‍यू झाला. या घटनेत महामार्ग विभाग आणि हायवे ठेकेदार यांचा निष्काळजीपणा समोर आला होता. या घटनेनंतर खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी (ता.९) उड्डाण पुलाची पाहणी केली होती. त्‍यावेळी वाहन चालकांना धोकादायक ठरत असलेले सिमेंट बॅरिकेट हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्‍यानंतर आज उड्डाण पुलावरील हे बॅरिकेड हटविण्यात आले. त्‍यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्‍त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे, वेताळ बांबार्डे आणि वागदे या ठिकाणची कामे अपूर्ण असूनही कामे केव्हा पूर्ण होणार, याची प्रतीक्षा वाहन चालकांना आहे.

वागदेतील एक लेन तीन वर्षे बंद

मुंबई-गोवा महामार्गावरील शहरालगतचा गडनदी पूल ते गोपुरी आश्रम या दरम्‍यान ५०० मीटर लांबीची एक मार्गिका अजूनही सुरू झालेली नाही. या भागातील जमीन मालकांना अजूनही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्‍याने या मार्गिकचे काम पूर्णत्‍वास गेलेले नाही. यात पाचशे मीटर अंतरासाठी एकाच मार्गिकेवरून वाहने ये-जा करत आहेत. महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने येथील सिंगल लेनवरूनच ये-जा करतात. त्‍यामुळे या ठिकाणी सातत्‍याने अपघात होत आहेत. मात्र, मोबदल्याचा प्रश्‍न सोडविण्यात अद्यापही प्रशासनाला यश आलेले नाही. कासार्डे, नडगिवे आणि वेताळ बांबार्डे परिसरातही एका लेनचा काही भाग भूसंपादनाचा प्रश्‍न न सुटल्‍याने अर्धवट स्थितीत आहे.

खारेपाटणच्या नवीन पुलाचा भराव खचला

महामार्ग चौपदरीकरणाचे सर्व ठिकाणचे काम निकृष्‍ट झाले आहे. यंदा मे महिन्यात खारेपाटणच्या शुकनदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र, पहिल्‍याच पावसात या पुलाचा भराव खचला आहे. महत्त्‍वाची बाब म्‍हणजे या पुलाची एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. यावरून वाहतूक सुरू नसताना देखील भराव खचल्‍याने चौपदरीकरण कामाचा निकृष्‍ट दर्जा उघड झाला. सध्या खचलेल्‍या भरावाच्या ठिकाणी नव्याने कॉंक्रिटीकरण करून लेव्हल केली जात आहे.

Web Title: Kankavli Flyover Barricade Barriers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top