राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री

Kankvli  BJP rally  Government  To Pull Down
Kankvli BJP rally Government To Pull Down

कणकवली  (सिंधुदूर्ग) : युतीची सत्ता असताना तेव्हाही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू शकले असते; पण त्यांनी कर्तृत्व पाहिलं आणि शिवसैनिकांना पदे दिली; मात्र आज सत्तेचा लाभ उठवून आर्थिक फायदा करून घेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी उद्धव ठाकरेंना नामधारी मुख्यमंत्री केलंय. एवढंच नव्हे तर नवं महाआघाडीचं सरकार तोडपाण्यासाठी विकासकामांना स्थगिती देत सुटलं आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी आज येथे केली. 

येथील भगवती मंगल कार्यालयात तालुका भाजपचा मेळावा झाला. यात श्री. राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह राजश्री धुमाळे, प्रभाकर सावंत, भाई सावंत, राजू राऊळ, सुरेश सावंत, राजन चिके, संतोष कानडे, प्रज्ञा ढवण आदी उपस्थित होते. 

जनतेमध्ये जाऊन  प्रश्‍न समजून घ्यावेत

श्री. राणे म्हणाले, "कोकणासह राज्यातील सर्वच विकास प्रकल्पांना स्थगिती देणारं हे सरकार आपल्याला खाली खेचायचं आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, आमदार, खासदार आदी सर्वच ठिकाणी शतप्रतिशत भाजप असं चित्र असायला हवं. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्‍न समजून घ्यावेत. एवढंच नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करायची तयारी ठेवा.''

 उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य व्यक्तिमत्त्व आहे

श्री. राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंना बाळासाहेब मुख्यमंत्री पदाची संधी देऊ शकले असते ; पण त्यांनी कर्तृत्व पाहिलं आणि मनोहर जोशी आणि मला संधी दिली . उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांचा अधिवेशनात एकाही प्रश्‍नाचं उत्तर देता आलेलं नाही. प्रत्येकवेळी त्यांना जयंत पाटील यांची मदत घ्यावी लागतेय. एवढंच नव्हे तर सातबारा कोरा करण्यासाठी 55 हजार कोटी तर शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी 23 हजार कोटी लागणार आहेत. त्याची तजवीज कशी करायची याचाही गंध ठाकरेंना नाही. त्यामुळे सरकार स्थापन होऊनही आजतागायत शेती कर्जमाफीची घोषणा महाआघाडी सरकारला करता आलेली नाही.'' 

भाजप मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, राजश्री धुमाळे, राजन चिके आदींनी पुढील सर्व निवडणुकांत शतप्रतिशत भाजपची सत्ता येईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. नागपूरला जाऊन महाआघाडी सरकारचे वाभाडे काढणार असे राणे यांनी जाहीर करताच सभागृहात प्रचंड टाळ्या झाल्या. त्याची दखल घेत असे जोशपूर्ण कायकर्ते आपणाला हवेत असे राणे म्हणाले. पूर्वीचे मावळे आम्ही कुठला किल्ला जिंकून आणू असं छत्रपतींना विचारायचे. आताचे कार्यकर्ते मात्र साहेब एकतरी पद द्या किंवा निवडणुकीचे तिकीट द्या यासाठी हेलपाटे मारत असल्याचीही खंत राणेंनी व्यक्‍त केली. 

पैशासाठी धर्मनिरपेक्षता 
बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्ववादी होती. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे धर्मनिरपेक्ष पक्ष समजले जातात; मात्र या तीनही पक्षांनी सत्तेतून मिळणाऱ्या पैशाच्या लोभापायी आपापली तत्त्व गुंडाळून ठेवली आहेत. अशी लोभी सत्ता आपणास महाराष्ट्र टिकू द्यायची नाही असा निर्धार प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन श्री. राणे यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com