'कर्जत शताब्दी' भाताची नवीन जात विकसित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

एक नजर

  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून  कोकणसाठी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित
  • मुख्यत्वे ही जात पोह्याच्या निर्मितीसाठी उपयुक्त. 
  • बोटवेल या स्थानिक जातीवर रेडिएशन करून जात विकसित. 
  • कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती. 

दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष संशोधनानंतर ती वापरात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रमोद सावंत यानी दिली. 

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत संशोधन केंद्राला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या केंद्राचे हे शताब्दी वर्षे असून या केंद्रातून सुमारे चाळीसपेक्षा अधिक भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या असून या केंद्राच्या शताब्दी वर्षानिमित्त भाताच्या या नवीन जातीला "कर्जत शताब्दी' असे नाव देण्यात आले आहे. कर्जत शताब्दी ही भाताची नवीन जात मूळ बोटवेल या स्थानिक जातीपासून तयार केली आहे. जुन्या भाताच्या जाती पेक्षा जवळपास हेक्‍टरी दुप्पट उत्पादन देणार आहे. आखूड व जाड असणारा हा तांदूळ खास पोह्यांसाठी उपयुक्त ठरणार असून यापासून मोदकाचे पीठही उत्तम प्रकारचे होऊ शकते.

राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 29 ते 31 मे दरम्यान राहुरी येथील कृषी विद्यापीठात झालेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेत या जातीच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या बैठकीला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ.सतीश नारखेडे उपस्थित होते.

कर्जत येथील भाताच्या बोटवेल या स्थानिक वाणापासून ही जात विकसित करण्यात आली आहे. मूळ स्थानिक जात ही उंच वाढते ,पीक शेतात लोळत असल्याने या भाताचे नुकसान होत होते. मात्र नव्याने विकसित करण्यात आलेल्या या जातीचे वाण उंच होत नसल्याने नुकसान होत नाही. बोटवेल या भाताच्या स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष संशोधन करून ही नवी जात विकसित करण्यात आली आहे. 

कर्जत संशोधन केंद्रावर बियाणे उपलब्ध 
रायगड, कर्जत, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग फोंडाघाट व काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर या नवीन जातीची गेली दोन वर्ष लागवड करून निरीक्षण संशोधन करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून ही जात विकसित करण्यात आली आहे. भाताची ही जात हेक्‍टरी चार टन उत्पादन देणारी असून यावर्षी पासून रायगड जिल्ह्यातील कर्जत संशोधन केंद्रावर "कर्जत शताब्दी' भाताच्या वाणाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. 

या जातीने हे होणार फायदे 

  • उंच वाढणार नसल्याने 
  • नुकसान टळणार 
  • ऊत्पन्नात मोठी वाढ होणार 
  • चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती 
  • उत्तम प्रकारचे मोदकाचे पीठही 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Karjat Shatabdi' New Variety of Paddy crop