करूळ घाट रस्ता खचला ; भुईबावडा-फोंडाघाटमार्गे पर्यायी वाहतूक सूरू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

घाट रस्त्यातील गटारे दगडमातीने भरलेली आहेत. पाणी गटारातून वाहण्याऐवजी रस्त्यावरूनच वाहते.

वैभववाडी - पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि सर्वाधीक वाहतूक असलेला जिल्यातील करूळ घाटरस्ता गुरूवारी (ता. १५) खचला. त्यामध्ये रात्री उशिरा आणखी वाढ झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे. सध्या भुईबावडा आणि फोंडाघाट या पर्यायी घाटमार्गाने वाहतूक सुरू आहे. 

तालुक्यात बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सायकांळपर्यत मुसळधार पाऊस पडत होता. घाट परिसरात पावसाने थैमानच घातले होते. घाट परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरूवारी सायकांळी उशिरा घाटरस्ता खचला. रस्त्याचा निम्मा अधिक भाग कोसळला. ही माहीती मिळाल्यानतंर बांधकाम आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्याच्या कडेला बॅरेल उभी करून एकेरी वाहतूक सुरू करून घाटरस्त्यात अडकलेल्या वाहनांना सोडण्यात आले. त्यानतंर देखील काही काळ एकेरी वाहतीक सुरू होती. परंतु रात्री उशिरा पुन्हा रस्ता खचला. त्यामुळे प्रशासनाने हा मार्गच वाहतुकीस बंद केला आहे.

सध्या या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट आणि फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. करूळ घाटमार्ग झाल्यामुळे भुईबावडा घाटरस्त्यावरील वाहतूक वाढली आहे.

दरम्यान पोलिसांनी करूळ घाटमार्गे वाहने जाऊ नयेत म्हणून वैभववाडीतील संभाजी चौकात मार्ग बंद केला आहे. वाहनचालकांकडे चौकशी करूनच त्यांना सोडले जात आहे.

 वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला करूळ घाट गेल्या काही वर्षापासून धोकादायक बनत चालला आहे. गेल्यावर्षी देखील दोन ठिकाणी हा रस्ता खचल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्या ठिकाणी पुर्नबांधणी केल्यानतंर यावर्षी नव्याने घाटरस्त्याला भगदाड पडले आहे. घाटरस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

घाट रस्त्यातील गटारे दगडमातीने भरलेली आहेत. पाणी गटारातून वाहण्याऐवजी रस्त्यावरूनच वाहते. या पाण्यामुळेच रस्त्याला भेगा पडणे, लहान भगदाडे पडणे असे प्रकार घडत असतात. याच भगदाडांचे पुढे रस्ता खचण्यात रूपांतर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु बांधकाम विभाग गटारांची साफसफाई का करीत नाही हा खरा प्रश्न आहे.

बारकाव्यांकडे दुर्लक्ष

घाटरस्त्याची सुरक्षा फक्त रस्त्याचे नुतनीकरण, कोट्यावधीची बांधकामे, करून केली जाते असा भ्रम बांधकाम विभागाने करून घेतलेला आहे. त्यामुळे दरवर्षी या घाटांमध्ये कोट्यावधी रूपयांची कामे केली जातात. परंतु लाख दीड लाख रूपये खर्चाच्या गटारांच्या साफसफाईकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. सुरक्षेतील बारकाव्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच हे घाटरस्ते धोकादायक बनत चालले आहे.

हे पण वाचानारायण राणे नावाचा दबदबा कायम ; सत्ता असो की नसो 

खचलेल्या घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी सुरू आहे. बॅरेलमध्ये दगड रचुन दुरूस्ती करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानतंर एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल त्यानतंर पुर्नबांधणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तुर्तास घाटरस्त्यातील गटारांची साफसफाई देखील करण्यात येणार आहे.

-एस.पी.हिरवाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karul Ghat road was blocked