खचलेला करूळ घाट पुन्हा सेवेत, दुरुस्ती पूर्ण 

एकनाथ पवार
Tuesday, 20 October 2020

गुरूवारी रात्रीपासुन या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली होता. त्यामुळे भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे पर्यायी वाहतूक सुरू होती. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - खचलेल्या करूळ घाटरस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीचे काम रविवारी (ता.18) रात्री पूर्ण करण्यात बांधकाम विभागाला यश आले. त्यामुळे तीन दिवसानंतर करूळ घाटातील वाहतूक सुरू झाली. गुरूवारी रात्रीपासुन या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली होता. त्यामुळे भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे पर्यायी वाहतूक सुरू होती. 

तालुक्‍यात 14 आणि 15 ऑक्‍टोबरला घाटपरिसरात देखील अतिवृष्टी झाली. त्यामुळे गुरूवारी सायंकाळी उशिरा करूळ घाट रस्त्याचा निम्मा अधिक भाग खचला. रस्त्याकडेला बॅरेल उभी करून घाटरस्त्यात अडकलेली वाहने सोडण्यात आली; परंतु त्यानंतर रस्त्याचा आणखी काही भाग खचला. त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे या मार्गाने वाहतूक करणे जिकरीचे आणि धोकादायक होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासुन हा घाटरस्ता पूर्णतः वाहतुकीस बंद करण्यात आला. सर्वाधिक वाहतूक असलेला घाटमार्ग बंद झाल्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांना चांगलाच मनस्ताप झाला. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविली आहे. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून खचलेल्या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. बॅरेलमध्ये दगडमाती भरून त्याच्या सहाय्याने खचलेल्या ठिकाणी रचण्यात येत होती. धोकादायक स्थितीत असल्यामुळे अतिशय सावधगिरीने हे काम तीन दिवस सुरू होते. काल रविवारी रात्री उशिरा दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात बांधकाम विभागाला यश आले. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.पी.हिरवाळे यांनी तहसीलदारांना आज दिले. तहसीलदार रामदास झळके यांनी पोलिसांना करूळ घाटमार्गे एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना केली. 

भुईबावडा घाटरस्त्याला भेगा 
भुईबावडा घाटरस्त्याला यापुर्वीच भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ताही खचण्याची शक्‍यता आहे. गटारांच्या सफाईकडे होणारे दुर्लक्षच घाटरस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार आहे. भविष्यात घाटरस्त्यालगतची गटारे साफ करावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. 

करूळ घाटरस्ता दुरूस्तीचे काम काल रात्री उशिरा पूर्ण झाले. आज सकाळी तहसीलदारांना काम पूर्ण झाल्याचे पत्र दिले. त्यानुसार तहसीलदार पोलिसांना रस्ता सुरू करण्याचे पुढील आदेश देतील. 
- एस. पी. हिरवाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैभववाडी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karul Ghatarasta came back to service