भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण : नियमांत राहून जपणार नामसप्ताहाची परंपरा...

मकरंद पटवर्धन
Wednesday, 22 July 2020

काशिविश्‍वेश्‍वर मंदिर ; पाच माणसांमध्ये भजन, 30 ठिकाणी होणार नामसप्ताह

 रत्नागिरी :  सणांचा राजा श्रावण. या महिन्यात अनेक सण आणि व्रतवैकल्ये असतात. परंतु यंदा कोरोनामुळे याला फटका बसला असला तरी नामसप्ताह, संततधार, व्रतवैकल्ये यांची परंपरा जपली जाणार आहे. शासकीय नियम पाळून, एका वेळी पहार्‍यात फक्त 5 माणसांमध्ये भजन होईल. मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जाईल. जिल्हा प्रशासनाने अटी, शर्तीनुसार ही परवानगी दिल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी परिसरात सुमारे 30 ठिकाणी अशा प्रकारे नामसप्ताह साजरे होणार आहेत.

हेही वाचा-रत्नागिरीमध्ये 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन... कोणती वाचा....

दीप अमावस्येनंतर लागणार्‍या श्रावण महिन्यात मांसाहार, मद्य वर्ज्य मानून उपवास, व्रतवैकल्ये, सोवळे मोठ्या प्रमाणात पाळले जाते. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला (दहीहंडी) आदी सण समारंभ श्रावणात साजरे होतात. यंदा कोरोनामुळे या सणांना ब्रेक लागणार अशी स्थिती होती. परंतु रत्नागिरी परिसरातील विविध मंदिर संस्थांनी उच्च व तंत्रशिक्षणंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी चर्चेनुसार अटी, शर्तींवर उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली. उत्सवांसाठी समिती नेमली असून यामध्ये अ‍ॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, अ‍ॅड. आदेश चवंडे, दिनेश सावंत, रूपेंद्र शिवलकर, प्रसाद तथा बापू गवाणकर, मुन्नाशेठ सुर्वे आदींचा समावेश आहे.

हेही वाचा- खरे आकडे लपावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे मागितली हजारो कोटींची मदत : निलेश राणे यांनी समोर आणली वस्तुस्थिती -
रत्नागिरी, संगमेश्‍वरसह अन्य तालुक्यांत नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. ग्रामस्थांनी सामंजस्याने व आरोग्याचा विचार करून सहभाग घ्यावा, असे आवाहन देवस्थानने केले आहे. मंदिरात होणारे पहारे अर्थात आळीपाळीने भजन सेवा करण्यासाठी प्रत्येक वाडीच्या मानाप्रमाणे 5 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये तंबोरेधारक 1 व्यक्ती, 3 भजनकर्ते, 1 मृदूंगवादकाचा समावेश असेल. पालखी मिरवणुकीची प्रथा फक्त 5 व्यक्तींमध्ये पार पडेल. नामसप्ताहात भाविकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी उपस्थित राहता येणार नाही. नारळ, हार, पेढे असे कोणत्याही देवाला अर्पणासाठी आणू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- सिंधुदुर्गात  बुधवारची सकाळ  चार  कोरोना बाधित रुग्णांनी... -

भाविकांना आवाहन
जिल्ह्याबाहेरील भाविकांना नामसप्ताहात सहभागी व्हायचे असल्यास 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. गावाबाहेरील कोणचेही भजन होणार नाही. मंदिराच्या परिसरात दुकाने, खाद्यपदार्थ, स्टॉल स्थापन करण्यास मनाई आहे. मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashivishveshwar Temple Bhajan in five people Namasaptha will be held in 30 places