यंदा बाप्पाच्या पुजेच्या ताटात नसणार 'हे' महत्वाचे पान

चंद्रकात जोशी
Friday, 21 August 2020

पोली तालुक्यातील अनेक गावांमधील समुद्रकिनारी असलेले हे बन’ नामशेष

दाभोळ (रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील अनेक गावांमधील समुद्रकिनारी असलेले ‘केवड्याचे बन’ आता नामशेष झाल्याने समुद्रकिनारी गावांमध्ये भाद्रपदातील गणेशोत्सवामधील पुजेमध्ये हक्काचे स्थान असलेला ‘केवडा’ दुर्मिळ झाला आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले, आडे, केळशी आदी समुद्रकिनारी केवड्याचे बन हे तेथील वैभव मानले जात असे. समुद्रावरून बागांमध्ये येणारा वारा अडविण्याचे काम हे केवड्याचे बन करत असे. मात्र निसर्ग चक्रीवादळामध्ये ही केवडयाची बने उन्मळून पडली आहेत.

आंजर्ले केळशी या समुद्रकिनार्‍यावरुन जाणार्‍या मार्गावरील  सावणे येथे केवडयाचे मोठे बन होते. दरवर्षी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशाला प्रिय असलेल्या केवडयाच्या तयार झालेल्या (पिकलेल्या) कळया नेण्यासाठी या सावण्याच्या केवडयाच्या बनात मोठी गर्दी होत असे. ठरावीक लोकांनाच ही तयार झालेली केवडयाची कळी काढण्याचे कसब प्राप्त झालेले असून अन्य कोणी ही कळी काढण्यासाठी गेले तर या केवडयाचे काटे लागून त्याला जखमा  होत असल्याची माहिती काही कसबी लोकांनी दिली.मात्र 3 जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जसे बागायतींमधील नारळ व सुपारीच्या झाडांचे नुकसान झाले तसेच नुकसान या केवडयाच्या बनांचे झाले असून सावणे येथील केवडयाच्या या बनातील बहुसंख्य भाग हा उन्मळून  पडला आहे तर आंजर्ले येथील समुद्रकिनारी असलेली अनेक केवडयाची बनेही नामषेश झाली आहेत.

हेही वाचा- चिपळूणातील गणेशोत्सवासाठी पालिकेने आणली ही खास योजना

दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या अगोदर किंवा याच महिन्यात या केवडयाच्या कळया तयार होतात. भाद्रपद महिन्यातील  गणेशोत्सवात पार्थिव गणेशाच्या पूजेसाठी समुद्रकिनारी असलेल्या सर्वच गावांमध्ये या पार्थिव गणेशाची पूजा करण्यासाठी असलेल्या पूजेच्या ताटात इतर फुलांसोबत पिकलेल्या केवडयाच्या पातीने  आपले हक्काचे स्थान निर्माण केलेले आहे. यावर्षी मात्र अनेकांच्या पूजेच्या ताटात केवडयाची पात आता दुर्लभ असणार आहे.समुद्र किनारी असलेल्या गावातील अनेक जण शहरी भागातील आपल्या आप्त, स्वकीयांसह मित्र मंडळीला   गणपती उत्सवासाठी गणेश चतुर्थीच्या अगोदर एक पिकलेल्या केवडयाची कळी भेट देण्याची पद्धत गेली अनेक वर्षे रूढ झाली होती, त्यांना यावर्षी केवडा मिळणे दुर्लभ होणार आहे.

हेही वाचा-सप्टेंबरपूर्वी  होणार रत्नागिरीतील वाळू गटाचा लिलाव

पिकलेल्या केवडयाची पातीचा एखादा तुकडा पूर्वी तंबाखू खाणारे आपल्या तंबाखूच्या डब्यात ठेवत असत त्यामुळे काही दिवसांनी तंबाखुला केवडयाचा वास येत असे व हा तंबाखू खाण्यात  वेगळीच मजा येत असल्याची माहिती  काही जुन्या काळातील  तंबाखू शौकिनांनी दिली आहे.
आता पुन्हा या केवडयाची लागवड केल्यास काही वर्षानी पुन्हा पूजेसाठी केवडा उपलब्ध होणार आहे.
 

आमच्या आठवणीत भाद्रपदातील चतुर्थीच्या दिवशी होणार्‍या  पार्थीव गणेशाच्या पुजेच्या वेळी  केवडयाची पात पुजेच्या ताटात नाही असे कधी झालेले नाही मात्र यावर्षी पुजेसाठी केवडयाची पात मीळणे कठीण झाले आहे.
 विजय निजसुरे, आंजर्ले

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kevada became rare Anjarle Aade Kelshi and other coastal forests of Dapoli taluka considered to splendor of Kevada