चिंता मिटली, येणे-जाणे झाले सोपे, चाकरमानीही आनंदी

अनिकेत जामसंडेकर
Saturday, 5 September 2020

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खारेपाटण तपासणी नाक्‍यावर 15 मार्च पासून बॅरिकेट लावून जिल्हा बंदी करण्यात आली होती. यात सुरवातीला अत्यावश्‍यक सेवेतील वाहन चालकांनाच प्रवेश दिला जात होता.

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - इ-पास आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठविल्यानंतर खारेपाटण तपासणी नाका मोकळा झाला आहे. तपासणी नाक्‍यावरील अडथळे दूर झाल्याने खारेपाटणच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या राजापूर, वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान येथील तपासणी नाक्‍यावर मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची फक्‍त नोंदणी आणि थर्मल तपासणी केली जात आहे. 

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खारेपाटण तपासणी नाक्‍यावर 15 मार्च पासून बॅरिकेट लावून जिल्हा बंदी करण्यात आली होती. यात सुरवातीला अत्यावश्‍यक सेवेतील वाहन चालकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानंतर फक्‍त ई पास असलेल्या वाहनांनाच जिल्ह्यात येण्यास परवानगी दिली जात होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणारे चाकरमानी आणि तपासणी नाक्‍यावर असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे चाकरमान्यांना सिंधुदुर्ग प्रवेशासाठी चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत होते.

राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत ई पास सक्‍ती तसेच आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध हटविले. त्यानंतर येथील तपासणी नाक्‍यावरील अतिरिक्‍त लावण्यात आलेले अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. तर केवळ मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी आणि थर्मल गनने तपासणी केली जात आहे. 

आता येणे-जाणे सोपे 
खारेपाटण तपासणी नाका खुला झाल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याच्या सीमावर्ती असणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अनेक गावांना झाला आहे. राजापूर तालुक्‍यातील पंधराहून अधिक गावे खारेपाटण बाजारपेठेशी जोडली गेली आहेत. याखेरीज देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील अनेक गावांना खारेपाटण बाजारपेठ जवळची आहे. या नागरिकांनाही आता निर्धोकपणे तपासणी नाका ओलांडून बाजारपेठेत येणे-जाणे सोपे झाले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kharepatan checkpost unlock