
खेड : झाडे भुईसपाट; लाकूडमाफिया मोकाट!
खेड : तालुक्यातील अनेक भागांमध्ये डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. गतवर्षी पावसाळ्यात तालुक्यातील सातगाव व पंधरागाव परिसरात डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात माती ढासळून जीवितहानी झाली आहे; मात्र तरीदेखील लाकूडमाफिया डोंगरउतारावरील झाडांवर कुऱ्हाड चालवत असून, त्याचे हात रोखण्याचे काम वनविभाग करताना दिसत नाही. परिणामी आगामी पावसाळ्यात डोंगर उतारावरील झाडांवर चाललेली कुऱ्हाड पुन्हा एकदा माणसाच्या मुळावर उठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोकणात गतवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी डोंगर ढासळले. महाड, खेड, चिपळूण आदी ठिकाणी डोंगरावरून ढासळलेल्या दगड व मातीखाली मानवी वस्ती गाडली जाऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात या घटना वाढल्या असून, त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारचे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष म्हणावे लागेल. डोंगर उतारावर माती धरून ठेवणाऱ्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्यासाठी होत आहे.
खेड तालुक्यातील पंधरागाव, सातगाव, शिवतर आदी परिसरातील हजारो एकर भागातील डोंगरउतारावरील झाडे लाकूडमाफियांनी तोडून आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत; मात्र या बेलगाम लाकूड व्यापाऱ्यांवर नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी असलेले वनविभाग व तालुका प्रशासन मात्र या प्रकारांकडे कानाडोळा करत आहे. परिणामी आगामी पावसाळ्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वृक्षांची पाळेमुळे खोदून काढली
खेड तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून जवळच असलेल्या डोंगररांगामध्येदेखील बेसुमार वृक्षतोड झाली असून, या भागात भूस्खलन झाल्यास मातीचा मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर येऊन महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भोस्ते व परशुराम घाटातदेखील डोंगरउतारावरील वृक्षांची पाळेमुळे खोदून काढण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत या भागातदेखील दरड कोसळण्याची भीती आहे.
Web Title: Khed Plants Flat Lakudmafia Mokat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..