
डोक्यावरील हंडा उतरला; पायपीटही थांबली!
राजापूर : खिणगिणी गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खरोखरचा उतरला आहे. येथे पाणी योजना सुरू झाली असून पाण्यासाठी होणारी येथील महिलांची दीड कि.मी.ची पायपीट थांबली आहे. आता घरोघरी पाणी येणार आहे.तालुक्यातील खिणगिणी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी वैभव कोकरे यांचा पुढाकार आणि पाठपुराव्यातून खिणगिणी ग्रामपंचायतीद्वारे धनगरवाडीसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या माध्यमातून खिणगिणी धनगरवाडीतील महिलांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण असलेली सुमारे दीड-दोन किमी पायपीट आता थांबणार आहे. एवढेच नव्हे तर येथील घरांमध्ये नळजोडणी देण्यात येणार आहे.
दरम्यान, धनगरवाडीतील महिलांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी वर्षानुवर्षे सुरू असलेली भटकंती थांबविण्याचा निर्धार ग्रामपंचायत सदस्य कोकरे यांनी निवडणुकीच्या दरम्यान केला होता. त्याप्रमाणे त्यांनी धनगरवाडीची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी आवश्यक असलेल्या नळपाणी योजनेला मंजुरी देणे, निधी उपलब्ध करणे आदींसाठी सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावाही केला. त्यासाठी त्यांना सरपंच मानसी कदम, उपसरपंच दिवाळे, ग्रामपंचायत सदस्य, मनोज कदम, वाडीतील ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या साऱ्यांच्या प्रयत्नांना यश येऊन धनगरवाडीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेचे काम मार्गी लागले आहे. पाणी योजनेच्या माध्यमातून धनगरवाडीतील महिलांना आता हक्काचे आणि हमखास पाणी मिळत असून वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येतून त्यांची आता सुटका झाली आहे.
रोजगारासाठी न जाता, पाण्यासाठी भटकंती..
तालुक्यातील खिणगिणी येथे धनगरवाडी वसलेली आहे. या वाडीला गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत असून पाण्यासाठी वणवण करावी लागते. एप्रिल-मे महिन्यातील टंचाई काळात येथील महिलांसह ग्रामस्थांना रोजगारासाठी न जाता, पाण्यासाठी दिवसभराचा कालावधी व्यतीत करावा लागत होता. ही समस्या संपुष्टात आलीय.
Web Title: Khingini Gram Panchayat Tap Water Scheme Rajapur Konkan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..