esakal | रायगड : मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली वाहतूक बंद
sakal

बोलून बातमी शोधा

rain.jpg

सुधागड तालुक्यात आज अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले. परिणामी सकाळपासूनच दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

रायगड : मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली वाहतूक बंद

sakal_logo
By
अमित गवळे

पाली : सुधागड तालुक्यात आज अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले. परिणामी सकाळपासूनच दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, मागील महिन्यात देखील 4 तारखेलाच या दोन्ही पुलावरून पाणी गेले होते. गेल्या दीड महिन्यातील पुलावरून पाणी जाण्याची व अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याची ही सहावी वेळ आहे.

सुधागड तालुक्यात प्रशासनाकडून देखील नागरिकांना व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळपासूनच वाकण फाटा, पाली व जांभुळपाडा अंबा नदी पूल येथे पोलीस तैनात करण्यात आले होते. पुलावरून पाणी गेल्याने वाहनांना प्रवेश नाकारला होता. पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेल्याने पोलिसांनी वाकण वरून खोपोलीकडे जाणारी व खोपोली पाली वाकणकडे होणारी वाहतूक बंद केली होती.

याबरोबरच नांदगाव पुलावरून देखील पाणी गेले होते. पाली खोपोली मार्गावर आंबोले गावाजवळ व पाली जवळील गिर आंबा येथे देखील रस्ता पाण्याखाली गेला होता. नदी किनाऱ्यावरील संपूर्ण शेती पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यावर संकट आले आहे.

वाकण पाली खोपोली मार्ग सातव्यांदा बंद -
पाली व जांभुळपाडा येथील अंबा नदीवरील पुलांची उंची कमी आहे. त्यामुळे मुसधार पावसामुळे नदीचे पाणी वाढून दरवर्षी या पुलांवरून पाणी जाते. तसेच या मार्गावर आंबोले, गिर आंबा, वाकण आदी ठिकाणी देखील पाणी साठते. परिणामी वारंवार येथील वाहतूक ठप्प होते. यंदाच्या पावसाळ्यात तर येथील वाहतूक ठप्प होण्याची ही सातवी वेळ आहे. परिणामी येथील लोकांना व प्रवाश्यांना हकनाक याचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यापाऱ्यांचा माल, दूध, वर्तमानपत्र, भाजी व औषधे हे सर्व वस्तू घेऊन येणारी वाहने अडकून पडतात. बऱ्याच वेळा ते वाट पाहून पुन्हा पाठी फिरतात त्यामुळे खूप गैरसोय होते. तसेच व्यवसाय व धंदा देखील बुडतो. अनेकांना कामावर जात येत नाही. हकनाक त्यांची सक्तीची रजा होते.

प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. तसेच खबरदारीचा इशारा दिला आहे. पोलीस व महसूल कर्मचारी दोन्ही पुलांजवळ तैनात आहेत. प्रत्येकाने देखील आपली काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास जोखीम घेऊन घराबाहेर पडू नये. - दिलीप रायन्नावार, तहसीलदार, सुधागड-पाली

मुसळधार पावसामुळे नेहमी पाली अंबा पुलावरून पाणी जाते. त्याबरोबरच नांदगाव व जांभुळपाडा पुलांवरून देखील पाणी जाते. अशा वेळी कामावर निघून पुन्हा पाठी फिरावे लागते. परिणामी नाईलाजाने सक्तीची रजा घ्यावी लागते. त्यामुळे लवकरात लवकर या पुलांची उंची वाढविण्यात यावी. - सुशील शिंदे, नोकरदार (अभियंता), पाली

loading image
go to top