
अनिल परबांचा रिसॉर्ट तोडण्याचे CM शिंदेंचे आदेश; किरीट सोमय्यांचा दावा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार आणि मंत्र्यांविरोधात आक्रमक झालेले किरीट सोमय्या पुन्हा सक्रीय झाले आहेत. अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टविरोधात आता सोमय्यांनी कंबर कसली आहे. हा रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीमध्ये दाखल झाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे अनिल परब यांचा दापोलीमध्ये साई रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. हा रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सोबत एका मोठ्या हातोड्याची प्रतिकृतीही आणली आहे. ते आजच रिसॉर्ट पाडण्याचा प्रारंभ करणार आहेत.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. सोमय्या म्हणाले की, गेली तीन वर्ष दादागिरी करणारे सरकार होते. कोविड काळात पैसे कमवून पालकमंत्री अनिल परबांनी रिसॉर्ट बांधलं. पण प्रामाणिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे अनधिकृत रिसॉर्ट पाडायचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मी आजपासून हा रिसॉर्ट पाडायला सुरुवात करतोय. फडणवीस आणि शिंदेंच्या आदेशावरुन हा रिसॉर्ट मी पाडत आहे.