कोकण : शेतकऱ्यांना १.८२ लाख कोटी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Sanman Nidhi yojana

कोकण : शेतकऱ्यांना १.८२ लाख कोटी वाटप

गुहागर : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून, किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १.८२ लाख कोटी इतक्या रकमेचे वाटप तर २३ कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी दमदार पावले टाकली आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी ते बोलत होते. तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू या अन्नधान्यांच्या तसेच तेलबियांच्या किमान हमीभावात (एमएसपी) मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत भरीव वाढ केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. नातू यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने अनेक निर्णय प्रत्यक्षात आणले आहेत. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १ लाख २३ हजार ९६० कोटी इतकी तरतूद केली आहे. किसान सन्मान निधी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रु. दिले जातात. योजनेचा प्रारंभ झाल्यानंतर गेल्या ३ वर्षांत या योजनेद्वारे आतापर्यंत १० हप्त्यांत १ लाख ८२ कोटी इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना गरजेवेळी तातडीने पैसे उपलब्ध व्हावेत, या हेतूने ३ लाख रु. पर्यंतचे कर्ज कमीत कमी व्याजदरात किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. ४ मार्च २२ पर्यंत २.९४ कोटी शेतकऱ्यांना ३.२२ लाख कोटी इतक्या रकमेचे कर्ज मंजूर केले आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून प्रोसेसिंग फी वगैरे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून देण्यासाठी २०१६ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या ६ वर्षांत या योजनेद्वारे १ लाख ७ हजार कोटी इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम ) या योजनेत १.७२ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १.८२ लाख कोटी रकमेच्या शेतमालाची विक्री यातून झाली आहे.

किसान सन्मान निधी

माती परीक्षणाचा उपयोग

शेतकऱ्यांना जमिनीचे माती परीक्षण करून देऊन त्याद्वारे जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी मृदा आरोग्य कार्डचे वाटप केले जाते. आतापर्यंत २३ कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मातीची तपासणी करण्यासाठी ११ हजार ५३१ प्रयोगशाळांना मंजुरी देण्यात आली आहे.

एक नजर

कृषी क्षेत्रासाठी तरतूदः

१ लाख २३ हजार

९६० कोटी

किसान सन्मान निधी योजनेद्वारे वर्षाला देतातः ६ हजार रु.

३ वर्षांत योजनेद्वारे १० हप्त्यांत रकमेचे वाटपः

१.८२ लाख कोटी

Web Title: Kokan 182 Lakh Crore Distributed 12 Crore Farmers In Country Kisan Sanman Nidhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top