esakal | दापोलीतील दुर्गम भागातील 27 शेतकर्‍यांनी बनवला  'कोकण सदाबहार’ ब्रॅन्ड
sakal

बोलून बातमी शोधा

kokan farmer farming story 27 farmers have come together and implemented village seed production project for Konkan Agricultural University

 या गावात चार वर्षापूर्वी माधव शिंदे नावाचे कृषी सहाय्यक बदली होऊन आले व त्यांनी शेतकर्‍यांची मानसिकता बदलूनच टाकली

दापोलीतील दुर्गम भागातील 27 शेतकर्‍यांनी बनवला  'कोकण सदाबहार’ ब्रॅन्ड

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी)  : एखाद्या कृषी सहाय्यकाने शेतकर्‍यांना अचुक मार्गदर्शन केले तर शेतकर्‍यांची उन्नत्ती कशी होउ शकते याचा प्रत्यय दापोली तालुक्यातील कोंगळे गावातील शेतकर्‍यांनी गटशेती करुन दाखवून दिला आहे.


दापोली तालुक्यातील दुर्गम ठिकाणी व आंजर्ले खाडीच्या एका बाजूला असलेले कोंगळे हे गाव या गावात 150 घरे असून लोकसंख्या केवळ 265 आहे.  या गावात चार वर्षापूर्वी माधव शिंदे नावाचे कृषी सहाय्यक बदली होऊन आले व त्यांनी शेतकर्‍यांची मानसिकता बदलूनच टाकली. मानसिकता एवढी बदलली की 27 शेतकर्‍यांनी एकत्र येऊन कोकण कृषी विद्यापीठासाठी ग्राम बिजोत्पादन प्रकल्प राबविला आहे. 5 एकर जागेत हा प्रकल्प राबविण्यात आला असून त्यात कर्जत 2 जातीचे 250 किलो भाताचे बियाणे पेरण्यात आले होते. सध्या हे भात तयार झाले असून नुकतीच या प्रकल्पाला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच सर्व संचालक, कृषी विभागाचे अधिकारी  यांनी भेट देऊन शेतकर्‍यांचे कौतुक केले.


या संदर्भात माहिती देताना शेतकरी उत्तम साळवी म्हणाले की, माधव शिंदे हे कृषी सहाय्यक कोंगळे येथे आल्यावर त्यांनी शेतकर्‍यांच्या बैठका घेऊन शेतकर्‍यांना उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन केले. कुडावळे येथील एकनाथ मोरे येथे भाजीपाल्याची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतावर आम्हाला ते घेऊन गेले व तेथे त्यांनी व  विनायक महाजन यांनी भाजीपाला लागवडीची माहिती आम्हाला करुन दिली त्यानंतर आम्ही गावातील शेतकर्‍यांनी भाजीपाला लागवड सुरू केली. त्यानंतर कृषी विदयापीठाच्या प्रक्षेत्रावर आम्ही गावातील शेतकरी गेलो तेथील लागवडीची आम्ही माहिती घेतली. 

बारामती येथील कृषी विद्या प्रतिष्ठानच्या कृषी विज्ञान केंद्रालाही आम्ही गावातील शेतकर्‍यांनी भेट देऊन आधुनिक शेती कशी केली जाते याची माहिती घेतली.  त्यानंतर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कृषी विद्यापीठाकडून ‘कोकण सदाबहार’ या जातीच्या चवळीचे बियाणे घेऊन त्याची लागवड केली. गेल्या वर्षी कृषी विद्यापीठातील संशोधन उपसंचालक (बियाणे) डॉ. अरुण माने यांनी चवळीसाठी ग्रामबीजोत्पादन प्रकल्प राबवाल का असे विचारले असता गाव अध्यक्ष महादेव साळवी यांच्या नेतृत्वाखाली  आम्ही 27 शेतकर्‍यांनी एकत्र येत 12 किलो चवळीच्या ’कोकण सदाबहार’ या बियाण्याची लागवड केली. सर्वांनी चांगली मेहनत घेतल्याने चवळीचे चांगले उत्पादन आल्यावर कृषी विदयापीठाने 100 किलो चवळी  बियाणे म्हणून आमच्याकडून विकत घेतली. त्यामुळे आम्हालाही चांगला आर्थिक लाभ झाला.


यावर्षी आम्ही कोकण कृषी विद्यापीठासाठी ग्रामबिजोत्पादन प्रकल्प राबविला असून त्यासाठी कर्जत 2 हे भाताचे बियाणे 5 एकर जागेत लावले आहे. या लागवडीसाठी आम्ही गावातील शेतकर्‍यांची शेते भाड्याने घेतली आहेत. भात लागवडीसाठी  आम्हाला कोकण कृषी विदयापीठाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कर्जत 2 लागवडीसाठी माधव शिंदे व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी आमची शेतीशाळा घेतली, भातावर पडणार्‍या किडी कशा ओळखायच्या या किडींचा नाश करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याची माहितीही त्यांनी आम्हाला दिली. भात पिकावर आलेल्या किडींची माहिती देण्यासाठी रात्रीही त्यांनी आमच्या शेतात येऊन आम्हाला चांगले मार्गदर्शन केले आहे.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत असलेले आमचे गावकरी यावर्षी गावात आले होते त्यांनीही आम्हाला या प्रकल्पासाठी मदत केली.

हेही वाचा- कोल्हापूर नवदुर्गा  स्पेशल : कोकमच्या पानांपासून बनवला मालवणी ब्रॅंड ; आणि तिने ४० महिलांना बनविले ‘आत्मनिर्भर’ -


भाताच्या कापणीनंतर याही वर्षी आम्ही चवळीच्या ‘कोकण सदाबहार’ जातीची लागवड करणार आहोत व कृषी विद्यापीठाला बियाणे विकणार आहोत असे उत्तम साळवी यांनी सांगितले. 
या ग्रामबिजोत्पादन प्रकल्पात महादेव साळवी, महेश साळवी, सुवर्णा रेवाळे, मेधा साळवी, दिनेश मोहिते, अंकिता साळवी, चंद्रभागा साळवी, सविता साळवी, रामचंद्र बाईत, हर्षाली मोहिते, पांडुरंग रेवाळे, चंद्रकांत साळवी, आनंदी मोहिते, लक्ष्मण रेवाळे, अनिता रेवाळे, निकिता साळवी, अशोक रेवाळे, उत्तम साळवी, अक्षता साळवी, तुकाराम साळवी, प्रकार साळवी, हरिश्‍चंद्र साळवी, सुभाष रेवाळे, साक्षी साळवी, सलोनी साळवी, अपर्णा साळवी, काशिनाथ साळवी हे 27 शेतकरी सहभागी झाले आहेत.


आम्ही चवळीची लागवड केली आहे तसेच ग्रामबिजोत्पादन प्रकल्पही राबवत आहोत मात्र वन्य पशुंचा तसेच माकडांचा आम्हाला प्रचंड त्रास आहे. हा त्रास असला तरी आम्ही निराश होऊन शेती सोडली नाही. आम्ही शेतात 24 तास  राखण करतो व माकडांना व वन्य प्राण्यांना हुसकून लावतो व आमच्या शेताचे रक्षण करतो.
उत्तम साळवी, शेतकरी कोंगळे   

 संपादन - अर्चना बनगे