
रत्नागिरी : भूकंपाविषयी काही पूर्वसूचना मिळवण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांकडून केलेल्या खोदाईतून (ड्रिलिंग) गरम पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला. मात्र, तेथे घ्यावयाच्या चाचण्या वा माहिती मिळवणे शक्य झाले नाही; असे असले तरी गेली सहा वर्षे अखंडपणे एकाच तापमानाला तेथून गरम पाणी वाहात आहे. खडीकोळवण (ता. संगमेश्वर) गावात जिल्हा परिषद शाळेशेजारी हे बोअर आहे. उष्णतेचा हा प्रचंड स्रोत आर्थिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करता येईल का, यासाठी गावचे प्रयत्न सुरू आहेत.
2014 साली भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी भूकंपमापन ड्रिलिंग करण्यात आले. भूकंपाबाबत अभ्यास व संशोधनाकरिता संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण, मौजे कुंडी, मौजे नायरी, तसेच फणसवळे येथेही ड्रिलिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. तेथे जमिनीखाली भूकंपमापन यंत्र बसवायचे होते. ड्रिलिंग केल्यानंतर 1045 मीटर खोलवर गरम पाण्याचे झरे मिळाले. त्यानंतर 1200 मीटर खोलवर खोदाई केली. त्यामध्ये कॅमेरे सोडून भूगर्भातील हालचालीही नोंदवायच्या होत्या. परंतु प्रचंड उष्ण पाण्याने ते साध्य झाले नाही.
2014 पासून सारख्या दाबाने तेथून गरम पाणी वाहात असते. मात्र, त्याचा शेतीसाठी उपयोग करता येत नाही. या पाण्यावर भाजीलागवड करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या पाण्यात गंधक आहे. शिवाय त्याचे तापमान झाडांना सोसणारे नाही. खडीकोळवणमधील गांगेश्वर मंदिर आणि परिसर पर्यटकांना लुभावू शकतो. सरपंचांनी यासाठी प्रयत्न सुरू केले असून विविध खात्यांना पर्यटनासाठी हा परिसर विकसित करता येईल, यासाठी साकडे घातले आहे.
भूकंपाबाबत अभ्यास व संशोधन झाले तर आम्हाला आनंदच आहे. परंतु, त्याजोडीला उष्ण पाण्याचा अखंड झरा गावासाठी पर्यटन व्यवसायाचे दार खुले करू शकतो. त्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत.
- संतोष घोलम, सरपंच
"क' वर्ग पर्यटनस्थळ करण्याचा आग्रह
मार्लेश्वरपासून खडीकोळवण जवळ आहे. मार्लेश्वर रस्त्यावरून बामणोलीपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच देवरूखपासून 24 किलोमीटरवर आहे. त्या परिसरात फिरायला येणारे पर्यटक तसेच शाळांच्या सहली या ठिकाणी हटकून येतात. सह्याद्रीचा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी अनुकूल असा हा प्रदेश असल्याने त्याचे "क' वर्ग पर्यटनस्थळ करावे, अशी मागणी प्रभारी सरपंच संतोष घोलम यांनी सर्व सरकारी खात्यांकडे केली आहे.
एक नजर...
भूकंपाचा अभ्यासासाठी भूकंपमापन ड्रिलिंग
खडीकोळवण, कुंडी, नायरी, फणसवळेतही परवानगी
1200 मीटर खोलवर केली खोदाई; आढळले गरम पाणी
2014 पासून सारख्या दाबाने तेथून वाहतेय गरम पाणी
या पाण्यावर भाजीलागवड करण्याचा प्रयत्न अयशस्वी
आंघोळीसाठी तसेच कपडे धुण्यासाठी ग्रामस्थांकडून वापर
पावसातही हे पाणी असते कडकडीत
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.