Kokan Rain Update : चांदेराई बाजारपेठेत पाणी ; व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राजेश कळंबट्टे
Thursday, 15 October 2020

पुराचे पाणी वाढल्यास शेकडो एकर भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे

रत्नागिरी : पावसाचा जोर वाढत असून राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला पूर आला आहे.  तर रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीही दुथडी भरून वाहत असून किनाऱ्यावरील चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  लांजा तालुक्यात पुन्हा ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे.

 
 वादळी वाऱ्यानी किनारपट्टीला दणका दिला. तर काजळी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चांदेराई,  टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून चांदेराई बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले. पाणी वाढू लागल्याने बाजारपेठेतील व्यापारी सतर्क झाले आहेत. काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चांदेराईप्रमाणे, टेंभ्येपूल, सोमेश्‍वर, काजरघाटी आदी सखल भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुराचे पाणी वाढल्यास शेकडो एकर भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे भातशेती वाहून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनामुळे चार महिने घरात बसलेल्या शेतकर्‍यांवर आता सलग दुसऱ्या पुराचे संकट ओढवले आहे. लांजा तालुक्यातील देवराई, कुवे या भागातील नाले भरून वाहत आहेत. किनारी भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसाचा तडाख्यामुळे  मुबई गोवा महामार्गवर आबेंड ,तलेकांटे, बावनदी दरम्यान दरड कोसळे आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kokan Rain Update Flood the Arjuna River