वेध गणेशोत्सवाचे : कोकणात गावागावांची भूमिका ; क्वारंटाईन व्हा, मगच गावात मिसळा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

चाकरमान्यांना विनंती, ग्रामपंचायतींचा पुढाकार, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष 

रत्नागिरी : कोविड 19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यातील स्थानिकांमध्ये आढळत आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील नामसप्ताह आणि त्यानंतर गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत कसे करायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच सरसावू लागल्या आहेत. नामसप्ताहासह गणेशोत्सवापूर्वी चौदा दिवस आधी या, क्वारंटाईन व्हा आणि त्यानंतरच गावात मिसळा, अशी नवी भूमिका ग्रामपंचायतींकडून अप्रत्यक्षपणे घेतली जातेय. 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या साडेसातशेवर पोचली आहे. मागील काही दिवसांत स्थानिक बाधित आढळलेले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरिता 8 जुलैपर्यंत लॉकडाउन केले आहे. त्यात कदाचित वाढही होईल. कोरोनातील टाळेबंदीच्या कालावधीत मुंबई-पुण्यासह विविध भागातून परतलेले अनेक चाकरमानी गावागावांत वास्तव्याला आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासावरुन जिल्ह्यात विरोधी मतप्रवाह होते. तरीही काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासाठी ताकद पणाला लावली होती. आलेल्यांना क्‍वारंटाईन करुन ठेवण्यावर भर दिला गेला.

हेही वाचा- कोकणात पावसाचा जोर वाढला : हा बंधारा गेला वाहून ; ग्रामस्थांच्या उरात भरली धडकी... -

दीड लाखाहून अधिक चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात आल्याची नोंद आहे. अजूनही हजारो चाकरमानी मुंबईतच आहेत. बहुतांश अनेक मुंबईकर श्रावणातील नामसप्ताह आणि गणेशोत्सवासाठी गावी येतात. यंदाही ते सणाला गावी येण्यासाठी उत्सुक आहेत; मात्र कोरोनामुळे त्यांचे परतणे जिकिरीचे होणार आहे. मुंबईत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने त्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची भीती आहे. त्याला रोखण्यासाठी ग्रामपातळीवर आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरवात झाली. काही ग्रामपंचायतींनी चाकरमान्यांना सणापूर्वी चौदा दिवस आधी येऊन क्वारंटाईन होण्याची विनंती केली आहे. क्वारंटाईन कालावधीत त्यांना लक्षणे आढळली नाही तर गावातील उत्सवात बिनधोकपणे सहभागी होण्याची सूचना ग्रामस्थ करू लागले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुन्हा ग्रामकृती दलावरच राहणार आहे. 

हेही वाचा-कोकण मुंबई गोवा महामर्गावर झाड कोसळले  हा झाला रस्ता बंद.... -

प्रशासनाच्या बैठकीवर धोरण अवलंबून 
गणेशोत्सवासंदर्भात नियोजनासाठीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. त्याविषयी लवकरच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे सूतोवाच काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kokan village level start taking precautions from now ganesha festival