मच्छीमारांना मोठा दिलासा ; डिझेल परताव्यापोटी मिळाला मोठा निधी

राजेश शेळके
Saturday, 23 January 2021

डिझेल परताव्यापोटी कोकणाला 40 कोटी 64 लाख

 उदय सामंतांच्या प्रयत्नांना यश; जिल्ह्याला 7 कोटी 41 लाख

रत्नागिरी : मत्स्य दुष्काळ आणि बदलत्या वातावरणाचा फटका सहन करणार्‍या कोकणातील मच्छीमारांसाठी डिझेल परताव्यापोटी 40 कोटी 64 लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या परताव्यासाठी शिवसेना नेते, मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील मच्छीमारांना त्यापैकी 7 कोटी 41 लाखाचा परतावा मिळणार आहे.  

सातत्याने आलेली वादळे आणि त्यामुळे घटलेले मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आल्याने मच्छीमारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मासेमारी साठी जाताना लागणारे इंधन खरेदी केल्यानंतर त्याच्या पावत्या मत्स्य विभागाला सादर केल्या जातात. त्यानंतर शासनाकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर तो मंजूर होऊन डिझेल परतावा मच्छीमारांना मिळतो. अडचणीच्या हंगामामध्ये डिझेल परताव्याच्या साहाय्याने आर्थिक मदत मिळावी, यासाठी मच्छीमार संघटनांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते. 

हेही वाचा- बस-कंटेनर धडकेत २८ प्रवासी जखमी -

सामंत यांनी देखील मच्छीमार बांधवांची गरज लक्षात घेत राज्य पातळीवर अस्लम शेख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डिझेल परताव्याचा विषय लावून धरला. उदय सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. डिझेल परतावापोटी कोकणातील सात जिल्ह्यांसाठी 40 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 कोटी 41 लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan diesel refund Success efforts for uday samant kokan news