कोकण गणेशोत्सव : चाकरमान्यांसाठी आठ डब्यांची स्पेशल ट्रेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Ganeshotsav Special train of eight coaches for Chakarmanyas chiplun khed

कोकण गणेशोत्सव : चाकरमान्यांसाठी आठ डब्यांची स्पेशल ट्रेन

खेड : कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा, यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा ते चिपळूणदरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. तसेच थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर-मडगाव ट्रेन गणेशोत्सव कालावधीत सुरू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे.

या आधी काही वर्षांपूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत चिपळूणपर्यंत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती; मात्र रोह्याच्या पुढे कोकण रेल्वेमार्गावर चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे. या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७ / ०११५८ ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी १९, २१ ऑगस्ट २०२२, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर, १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही मेमू स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.

चिपळूणपर्यंत धावणारी पहिलीच...

कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमू स्पेशल ट्रेन प्रथमच चालवली जाणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे तसेच खेड या स्थानकांवर थांबे आहेत. चिपळूणपर्यंत धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल ट्रेन आठ डब्यांची असणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.