गृहराज्यमंत्र्यांच्या भागात गांजा पार्टी दुर्दैवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सावंतवाडी - गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांजा पार्टी होते आणि पोलिसांना माहितीसुद्धा नाही, हे दुर्दैव आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केली. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंतवाडी - गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांजा पार्टी होते आणि पोलिसांना माहितीसुद्धा नाही, हे दुर्दैव आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केली. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. केसरकर हे उद्योगपतींचे नेते आहेत. त्यांनी नेहमी बड्या लोकांचीच तळी उचलली आहे. त्यांना शेतकरी, बागायतदारांची किणव नाही; मात्र वणव्यामुळे लागणाऱ्या आगीची संख्या लक्षात घेता संबंधित बागायतदारांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहे, असे श्री. तेली यांनी सांगितले. या वेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर आदी उपस्थित होते.

श्री. तेली म्हणाले, ‘‘सावंतवाडीतील गांजा पार्टीचा प्रकार भयानक आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या सूत्रधारापर्यंत पोलिसांनी पोहोचणे गरजेचे आहे. हा प्रकार उघड करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सौ. अनारोजीन लोबो यांचे आम्ही भाजपच्या वतीने स्वागत करतो; मात्र दुसरीकडे ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत, त्यांच्याच पक्षाचे गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मतदारसंघावर लक्ष नाही. त्यांना पोलिस ऐकत नाहीत हे उघड झाले आहे. याची नैतिक जबाबदारी घेऊन पालकमंत्री केसरकर यांनी राजीनामा द्यावा. पोलिसांकडून हे प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रकार होत असेल, त्याचबरोबर त्यादिवशी माहिती दिल्यानंतरसुद्धा तब्बल दीड तासांनी पोहोचलेल्या त्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. भाजपचे शिष्टमंडळ उद्या (ता. २०) पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘हा प्रकार युवावर्गाच्या दृष्टीने घातक आहे. असे प्रकार घडू नयेत, यासाठी पालकांनीसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रकार रोखणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या प्रकाराच्या विरोधात आंदोलन उभारण्याची आमची तयारी आहे.’’

डिंगणे येथे लागलेल्या आगीत तेथील शेतकऱ्यांची बागातयी जळून खाक झाली. त्यात कोट्यवधीचे नुकसान झाले. आगीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता योग्य उपाययोजना करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले.

रेती काढण्याचे कंत्राट रद्द करून एका उद्योगपतीची तळी उचलणारे पालकमंत्री आता या शेतकरी बागातयदारांसोबत का राहिले नाहीत, याचे त्यांनी उत्तर द्यावे. महामार्गाच्या प्रश्‍नासंदर्भात तसेच जिल्ह्यातील अन्य प्रश्‍नांत केसरकर यांची भूमिका वेगळीच आहे, असेही तेली म्हणाले.

आंबोली स्टॉलचालकांना न्याय मिळावा 
आंबोली धबधब्याच्या परिसरात असलेल्या स्टॉलवरून अधिकाऱ्यांवर झालेल्या जातिवाचक शिवीगाळ गुन्ह्याबाबत ते म्हणाले, ‘‘या प्रकरणात कोणाची भूमिका काय आहे, यापेक्षा स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळाला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वन विभाग आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी एकत्र बसून निर्णय घेणे अपेक्षित आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी दोन्ही बाजू ऐकून घेण्यात यावी.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news ganja party