सुकेळी खिंडीत दरड कोसळण्याची भीती

महेश पवार
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागोठणे - मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीतील डोंगराची माती सुटी होत असल्याने दरड कोसळण्याची भीती आहे. वेळीच उपाययोजना केल्यास हा धोका टळू शकतो. 

नागोठणे - मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीतील डोंगराची माती सुटी होत असल्याने दरड कोसळण्याची भीती आहे. वेळीच उपाययोजना केल्यास हा धोका टळू शकतो. 

मागच्या वर्षी रात्रीच्या वेळेस याच ठिकाणी दरड कोसळल्यामुळे बारा तास वाहतूक कोंडी झाली होती. यंदा पावसाळ्याच्या आधीच खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज होती; परंतु त्या न करता सरकारी यंत्रणेकडून केवळ खिंडीची पाहणी करण्याचे सोपस्कर उरकले जातात. याच भागात रस्त्याची साईडपट्टीही खचली आहे. साईडपट्टीच्या खाली मोठ-मोठे दगड टाकल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या खाली गाडी उतरवणे कठीण झाले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणारी सुप्रीम इन्फ्रा कंपनी व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व  बाबींकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

संरक्षक कठड्यांची गरज 
खिंडीतील धोकादायक वळणांवरील संरक्षक कठडे उद्‌ध्वस्त झाले आहेत. वाहने दरीत कोसळण्याचा धोका आहे. वळणावरील कठड्यांचे लोखंडी पाईप, सिंमेट क्राँक्रीटचे बांधकाम तुटल्यामुळे वाहने खोल दरीत जाऊ शकतात. खिंडीत दरीच्या बाजूला मजबूत लोखंडी रेलिंग व सिंमेट क्राँक्रीटचे संरक्षण कठडे, रस्त्यालगत दुभाजक व साईडपट्टी, रात्री वाहनचालकांना मार्ग दिसण्यासाठी रेडियम फलक आदी उपाययोजनांची गरज आहे.

Web Title: konkan news Suklei Pass