कोकण रेल्वेची 15 पीआरएस काउंटर सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोकण रेल्वेची विविध शहरातील 15 पीआरएस काउंटर शुक्रवारपासून (ता. 22) सुरू झाली असून, त्या ठिकाणाहून परराज्यात जाण्यासाठी तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत.

रत्नागिरी - कोकण रेल्वेची विविध शहरातील 15 पीआरएस काउंटर शुक्रवारपासून (ता. 22) सुरू झाली असून, त्या ठिकाणाहून परराज्यात जाण्यासाठी तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील तिकीट काउंटरवर काही लोकांनी धाव घेतली होती. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात केलेल्या टाळेबंदीमुळे कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूक थांबलेली होती. त्यामुळे सर्वच तिकीट विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. विविध शहरातील पीआरएस काउंटरही बंद होते. टाळेंबदीचा चौथा टप्पा देशात सुरू झाला असून त्यात प्रवासी वाहतुकीला अटी व शर्ती टाकत परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तीन गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावतील. त्यासाठी शुक्रवारपासून विविध शहरातील पीआरएस काउंटर सुरू केली आहेत. त्यात माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा बेंदूर येथील कोकण रेल्वेचे काउंटर सुरू झाली आहेत.

महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे रत्नागिरीतून पराज्यात जाणाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. ज्यांनी तिकिटे आरक्षित केली असतील त्यांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करता येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Launches 15 PRS Counters Ratnagiri Marathi News