कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मुंबईत होणार 'या' तारखेला परिषद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

कोकणातील पन्नास लाखाहून अधिक लोकसंख्या मुंबई, पुणे, ठाणे, डहाणू, कल्याण, कर्जत भागात व्यवसायानिमित्त वास्तव्य करत असून आपल्या जन्मभूमीची नियमित सणानिमित्त देवकार्य, मृत्यू किंवा क्रियाविधीनिमित्त सातत्याने कोकणात येत असते.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोकण रेल्वे प्रवास संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे. कोकण रेल्वे मुख्यालयाचे कोकण रेल्वे हद्दीत स्थलांतर करणे तसेच उत्तर भारत दक्षिण भारतात धावणाऱ्या गाड्यांना कोकण रेल्वे मार्गातील सर्व स्थानकात थांबा देणे आदी मागण्यासाठी ही  परिषद घेण्यात येत आहे. ही परिषद रविवारी ( ता. ५) सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिरनजीक होणार आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वे संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

हेही वाचा - तिलारीत सापडले हे दुर्मिळ कासव 

श्री. सावंत म्हणाले, ""कोकणातील पन्नास लाखाहून अधिक लोकसंख्या मुंबई, पुणे, ठाणे, डहाणू, कल्याण, कर्जत भागात व्यवसायानिमित्त वास्तव्य करत असून आपल्या जन्मभूमीची नियमित सणानिमित्त देवकार्य, मृत्यू किंवा क्रियाविधीनिमित्त सातत्याने कोकणात येत असते. यावेळी प्रवासादरम्यान त्यांच्यावर होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी व संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी या एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने तुतारी एक्‍सप्रेस व दिवा-सावंतवाडी एक्‍सप्रेस कोच संख्या वाढवुन महिलांसाठी अतिरिक्त कोच लावणे, मुंबईहून कोकणात धावणाऱ्या सर्व गाड्यांना प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी तीन थांब देणे गरीब रथ एक्‍सप्रेसचे वेळापत्रक चार ते पाच तास अगोदर व चार ते पाच तास उशिरा करून खेड कणकवली येथे थांबा देणे, पुणे एरणाकुलम गाडी कर्जत कल्याण मार्गे रोज सोडण्यात यावी, मुंबई सावंतवाडी मुंबई ही पॅसेंजर गाडी दररोज रात्री सुरू करणे, कल्याण सावंतवाडी कल्याण डहाणू रोड गाडी दररोज सुरू करणे, प्रमुख तालुक्‍याच्या ठिकाणी स्टेशनवर बारा तास आरक्षण सुविधा देणे, दोडामार्ग येथे आरक्षण सुविधा देणे, प्रत्येक स्टेशनवर आवश्‍यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आदी विविध मागण्या या एल्गार परिषदेमध्ये मांडण्यात येणार आहेत. तरी सदर परिषदेशी संबंधित कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे.

हेही वाचा - PHOTOS : पश्‍चिम घाटात या नव्या फुलवनस्पतींचा शोध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Passengers Organisation Arrange Conference Sindhudurg Marathi News