कोकण रेल्वेचे गणेशोत्सवसाठीचे आरक्षण 29 पासून खुले

राजेश कळंबटे
बुधवार, 24 एप्रिल 2019

एक नजर 

  • कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून
  • तिकीट आरक्षण मिळवण्यासाठी होणारी चढाओढ कमी व्हावी यासाठी अतिरिक्त खिडक्‍यांची उपलब्धता मुंबईत
  • 15 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे नियोजन
  • ऑगस्टच्या शेवटी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून चाकरमान्यांसाठी खुले होणार आहे. तिकीट आरक्षण मिळवण्यासाठी होणारी चढाओढ कमी व्हावी यासाठी अतिरिक्त खिडक्‍यांची उपलब्धता मुंबईत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे नियोजन 15 सप्टेंबरपर्यंत केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या उन्हाळी सुट्यांचे नियोजन सुरू आहे. पश्‍चिम रेल्वेतर्फे जादा गाड्या सोडल्या जातात. त्याचप्रमाणे सर्वाधिक मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात येतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशाचे आगमन होत आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

पावसाचा कालावधी सुरू असल्यामुळे गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी चाकरमान्यांची तारांबळ उडते. रांगाच्या रांगा लावल्या जातात. त्यात काहींना आरक्षण मिळतच नाही. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने साडेचार महिने आधीच व्यवस्था केली आहे. रेल्वेच्या नियमानुसार तीन महिने आधी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यानुसार गणेशोत्सवात सुटणाऱ्या गाड्यांसाठी 29 एप्रिलपासून आरक्षण करण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी दादरसह प्रमुख स्थानकांवर जादा तिकीट खिडक्‍याही उपलब्ध करुन दिल्या जातील. त्यामुळे तारखांचे नियोजन करुन आतापासून मुंबईकरांना कोकणात येण्यासाठी तिकिटे काढता येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Railway Reservation for Ganesh Festival is open from 29th April