esakal | कोकण रेल्वे 31 मार्चपर्यंत ठप्पच ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Railway Service Unavailable Up To 31 March

जनता कर्फ्यूच्या निमित्ताने रविवारी (ता.22) धावणाऱ्या कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द केल्या होत्या; मात्र रविवारी रात्री मुंबईतून आलेल्या गाड्यांमधून अनेक चाकरमानी गावाकडे परतले आहेत.

कोकण रेल्वे 31 मार्चपर्यंत ठप्पच ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मुंबई - पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्यामुळे चाकरमानी कोकणाकडे वळू लागले आहेत. एसटी, रेल्वेतून लोढेंच्या लोंढे येणार होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 31 मार्चपर्यंत सर्वच्या सर्व गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गावरील सर्वच्या सर्व स्थानके सुनीसुनी होती; मात्र रेल्वे पोलिस सुरक्षेसाठी कार्यरत होते. 

जनता कर्फ्यूच्या निमित्ताने रविवारी (ता.22) धावणाऱ्या कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द केल्या होत्या; मात्र रविवारी रात्री मुंबईतून आलेल्या गाड्यांमधून अनेक चाकरमानी गावाकडे परतले आहेत. सध्या मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून आल्यामुळे शहरेच्या शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जात आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक चाकरमान्यांनी गावाकडे येण्यास सुरवात केली होती.

हा लोंढा कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे थांबणार आहे; मात्र जे चाकरमानी गावाकडे आलेले आहेत. त्यांनी घरीच विलगीकरण करबन राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत. त्यांना कोरोनासदृश लक्षणे नसली तरीही त्यांनी विलगीकरण करून राहणे आवश्‍यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामकृती दलालाही सूचना दिल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच वाहतूक 31 मार्चपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेहमीच गजबलेली रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, खेड स्थानके ओस पडली होती. रत्नागिरी स्थानकावर रेल्वे पोलिस निरीक्षक अजित मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 

 
 

loading image