#KonkanRain सावंतवाडी तालुक्‍यात नदी-नाल्यांना पूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

  • वेंगुर्ले तालुक्‍याला जोडणारा तळवडे गावातील होडावडे-तळवडे मार्गावरील पुलावर आज पुन्हा पाणी.
  • वेंगुर्लेला जाणारे तर काही वाहने मातोंडमार्गे रवाना.
  • शिरोडा बांदा मार्गावरील नावेली रेवेटेवाडी येथील गणपती पूल पाण्याखाली
  • मडुरा, पडलोस-केनीवाडा परिसरातील भात शेती अनेक ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे चित्र

सावंतवाडी - तालुक्‍याला आज मुसळधार पावसाने तडाखा दिला. नदी-नाल्यांना पूरस्थिती आल्याची स्थिती दिसून येत होती तर तालुक्‍यातील गावातील छोट्या-मोठ्या पुलांवरही ही पाणी वाहून जात असल्याने वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झालेली होती. अनेक नागरिकांना, शाळकरी मुलांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. या पावसामुळे तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 

वेंगुर्ले तालुक्‍याला जोडणारा तळवडे गावातील होडावडे-तळवडे मार्गावरील पुलावर आज पुन्हा पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली होती. या पुलावरून फारसे पाणी जात नसले तरी छोट्या वाहनांना पुलावरील पाणी कधी कमी होते. याची प्रतीक्षा करत थांबावे लागले होते. वेंगुर्लेला जाणारे तर काही वाहने मातोंडमार्गे रवाना झाले. मातोंड गावातून वाहनांची ये-जा चालू होती.

सकाळपासूनच पावसाने जोर धरला, तो थांबण्याचे नाव घेत नव्हता. गोवा सीमा भागातील गावांनाही त्याचा चांगलाच फटका बसला. शिरोडा बांदा मार्गावरील नावेली रेवेटेवाडी येथील गणपती पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तसेच या मार्गावरून शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची पुलावर पाणी आल्याने कोंडी झाली होती. या वेळी मुलांना तसेच नागरिकांना पलीकडे सोडण्यासाठी सहकार्य करण्यात येत होते. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक मात्र ठप्प झाली होती. 

मडुरा, पडलोस-केनीवाडा परिसरातील भात शेती अनेक ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. तालुक्‍यातील अनेक गावातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांनाही बरेच पाणी आले होते. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली दिसून येत होती. 

किंचित विश्रांती, पुन्हा पाऊस 
ग्रामीण भागातील छोट्या बाजारातील गटारे तुंबली होती. मुसळधार पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. जनजीवनही पूर्णता विस्कळीत झाले होते. दुपारी दीडच्या सुमारास पावसाने थोडीफार विश्रांती घेतली; मात्र अनेक ठिकाणी पावसाची रिप रिप सुरू होती; मात्र मात्र दुपारी 2 नंतर पुन्हा पावसाने जोर धरला. 

वीजपुरवठा खंडित 
मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक सरकारी तसेच खासगी कार्यालयांतील कामे खोळंबली. परिणामी आज नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली. कोकणात चार दिवसांपासून पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यातील आपत्ती विभाग कार्यरत असून तत्काळ मदत पोचविली जात असल्याचे दिसते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rain flood situation in Sawantwadi Taluka