#KonkanRains सिंधुदुर्गात पुर ओसरला; जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 

पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली भागांत पावसाने हाहाकार उडविला होता. सर्वत्र निर्माण झालेली पूरजन्य स्थिती व बंद पडलेले वाहतुकीचे मार्ग यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोसळणाऱ्या दरडी व घरांभोवती निर्माण झालेला पाण्याचा वेढा, अशा संकटातून बाहेर पडताना जिल्ह्यातील साधारण पाचशेपेक्षा जास्त लोकांना स्थलांतरीतही व्हावे लागले होते. या परिस्थितीत प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेची तारांबळ उडाली होती. 

जिल्ह्यात निसर्गाच्या ओढवलेल्या या संकटामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा येथे निर्माण झाला होता. घाटमाथ्यावरून जिल्ह्यात येणारे तिन्ही घाट रस्ते दरडी कोसळल्याने तसेच कोल्हापूर, सांगली भागांत पूर आल्याने वाहतुकीस बंद पडल्याने दूध, भाजी, डिझेल, पेट्रोल, फुले, चिकन आदी सहज मिळणाऱ्या वस्तूंसाठी लोकांना ताटकळत राहावे लागले. काही पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपल्याने अनेकांना पेट्रोलसाठी वणवण फिरण्याची वेळ आली, तर पेट्रोल-डिझेलअभावी जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.

ग्रामीण भागातील बऱ्याच फेऱ्या बंद ठेवाव्या लागल्या, तर खासगी वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तब्बल पाच दिवासांनंतर काल (ता. 10) जिल्ह्यात काही प्रमाणात जीवनावश्‍यक वस्तू दाखल झाल्या. पेट्रोल, डिझेल मिरजवरून रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटमार्गे वळसा घालून दाखल झाले. वास्को-गोवा येथूनही इंधन पुरवठा झाला. त्यामुळे हे संकट टळले, तर पावसाने काहीशी उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. दूध, भाजी आदी वस्तू बेळगाव संकेश्‍वर येथून छोट्या वाहनांद्वारे जिल्ह्यात पोचल्या. 

अतिवृष्टीमुळे रस्ते खचल्याने तसेच काही भाग वाहून गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. या ठिकाणी अद्याप प्रशासन न पोचल्याने हे मार्ग बंद आहेत; मात्र पर्यायी वाहतूक सुरू असली तरी आंबोली, चौकुळ, गेळे येथील सर्वसामान्यांचा अद्याप शहराशी संपर्क तुटला आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत केल्याने होणारी गैरसोय टळली आहे; मात्र काही भागांत विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. जिल्ह्यात बऱ्याच अंशी गावांत दूरध्वनी सेवा अद्यापही ठप्प असल्याने एकमेकांशी संपर्क तुटला आहे. बीएसएनएल याबाबत अद्याप गंभीर नसल्याचे दिसून येत असून याबाबत लोकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. 
 
दैनंदिन सुविधांपासून वंचित 
स्थलांतरित ग्रामस्थांना सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने स्थलांतरित करून आपल्यावरील जबाबदारी झटकल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना इतर खासगी संस्थांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Rains Decrease in Flood in Sindhudurg