कोकणचा समुद्रही होतोय डंपींग ग्राऊंड

कोकणचा समुद्रही होतोय डंपींग ग्राऊंड

कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे कोकणचा समुद्रही डंपींग ग्राऊंड बनत आहे. याचा थेट परिणाम सागरी जीव, मासे आणि एकूणच सागरी पर्यावरणावर होताना दिसत आहे. मुळ प्रश्‍नांचीच तीव्रता समजून घेतली जात नसल्याने सागरी प्रदुषण हाताबाहेर जाईल तेव्हा आपले डोळे उघडणार आहेत का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कोकणची स्थिती
महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा यात समावेश आहे. यातील मुंबईपासून रायगडच्या नागोठण्यापर्यंत समुद्रात होणाऱ्या रासायनीक प्रदुषणाचे प्रमाण जास्त आहे. अलीकडच्या वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये रासायनीक प्रदुषण करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी कोणतीही प्रक्रिया न करता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रदुषीत पाणी, द्रव समुद्रात सोडले जातात. रत्नागिरीतील दाभोळ खाडीतही रासायनीक प्रदुषण आढळते. रत्नागिरीपासून खालच्या भागात प्लास्टीक प्रदुषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. शिवाय मोठ्या शहरामधील सांडपाणीही समुद्रात सोडले जाते. याचा प्रभाव सध्या प्रकर्षाने जाणवत नसला तरी येत्या पाच वर्षात ही समस्या हातबाहेर जाईल अशी भिती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्‍त करत आहेत. 

सिंधुदुर्गातील अवस्था
गेल्या पंधरावड्यात पर्यटनस्थळ असलेल्या तारकर्लीत रापणीत बंपर कचरा सापडला होता. यानंतर पुन्हा सागरी प्रदुषणाच्या विषयाला तोंड फुटले. जिल्ह्यात बहुसंख्य नद्या सह्याद्रीकडून वेगाने समुद्राकडे येतात. समुद्राच्या जवळ त्यांचे रूपांतर खाडीत होते. त्यांचे पात्र विस्तारते. जिल्ह्याभरात मोठ्याप्रमाणात प्लास्टीक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नद्यांमध्ये पोहोचते. तेथून ते थेट समुद्रात येते. किनारपट्‌टीकडे अलिकडच्या काळात पर्यटन वाढत आहे. प्लास्टीक कचरा वाढण्याचे हेही एक कारण बनले आहे. जिल्ह्यात प्लास्टीक निर्मुलनाची कोणतीच सक्षम यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे किमान दोनशे वर्षे आयुष्य असलेला प्लास्टीक कचरा आपले मुक्‍कामाचे स्थळ म्हणून समुद्रात पोहोचत आहे. गेल्या वीस वर्षांच्या तुलनेत लाखो टन प्लास्टीक समुद्रात पोहोचले असून दरवर्षी याची तीव्रता वाढत आहे. 

मच्छिमारांमुळेही प्रदुषण
सागरी प्रदुषणाचा सर्वाधिक फटका मच्छिमारांना बसणार आहे. पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तेही यात सहभागी होत आहे. मच्छिमार वापरत असलेली जाळी नायलॉनची असतात. ती तुटली तर सर्रास समुद्रातच टाकली जाते. सागराच्या तळाशी ती वर्षानूवर्ष राहतात. ती खाल्ल्याने सागरी जीव मासे पचन संस्थेवर परिणाम होवून मृत होतात. समुद्रात मासेमारीला गेलेले खलाशी अन्न किंवा खाद्यपदार्थ सर्रास प्लास्टीकमधून नेवून तो कचरा तेथेच फेकतात. शिवाय नौकेसाठींच्या इंजिनाला वापरले जाणारे ऑईल, इंधन समुद्रात मिसळून प्रदूषण होते. पण जागृती अभावी मच्छिमारांना यांची जाणीवही नसते. 

कुठे साठतो कचरा?
समुद्रापर्यंत पोहोचलेला कचरा ठरावीक भागात साठून राहतो. यात प्लास्टीकसारखा तरंगणारा कचरा किनाऱ्याच्या दीड-दोन किलोमीटरच्या भागात वर्षानुवर्ष पडून असतो. सांडपाणी, रासायनीक द्रव हे प्रदूषणकारी घटक नदी, खाडी यांच्या मुखापासून दीड-दोन किलोमीटर भागात साठून राहतो. हाच भाग वन्यजीव प्रजननाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने याचा सागरी जीवचक्रावर दुष्परिणाम होतो. 

प्लास्टीकचा प्रवास
प्लास्टीकचा कुठलाही घटक किमान दोनशे वर्ष राहतो. एखादी प्लास्टीकची बाटली समुद्रात पोहोचल्यावर सुरूवातील ती तरंगते. कालांतराने तिचे प्लास्टीक कणात रुपांतर होते. मात्र हे कण अनैसर्गिक असतात. समुद्रात प्राणीजन्य व वनस्पतीजन्य सुक्ष्म आकाराचे प्लवंग असतात. माश्‍यांचे हे खाद्य असते. ते कल्ल्यांच्या मदतीने पाण्याबरोबर शरीरात घेतात. पण याबरोबरच प्लास्टीक कणही त्यांच्या पचन यंत्रणेपर्यंत पोहोचतात. हे घटक रासायनिक असल्याने यात माशाचा मृत्यू होतो. ही साखळी पुढच्या काळात खूप वेगाने वाढण्याची भिती आहे. तसेच झाल्यास माशांचे अस्तित्वही धोक्‍यात येईल.

नियंत्रण कोणाचे?
असा घातक कचरा समुद्रापर्यंत जावूच नये आणि भविष्यात तो निर्माण होवू नये यासाठी प्रयत्न झाले तरच समुद्राचे पावित्र्य कायम राहणार आहे. मात्र तशी यंत्रणाच सक्रिय नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कचऱ्याच्या दुष्परिणामांविषयी जागृती नाही. असली तरी हे सर्व थोपवणारी यंत्रणा नाही. समुद्र हा केंद्र आणि राज्याच्या प्रदुषण नियंत्रण विभागाकडे येतो. त्यांच्याकडून सर्रास सोयिस्कर ठिकाणी प्रदूषणाची सॅम्पल घेतले जातात. यामुळे नेमकी स्थिती समजत नाही. मेरीटाईम बोर्ड तर याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. त्यामुळे या सगळ्यावर नियंत्रण नेमके कोणी ठेवायचे याचे कोडेच कोकण किनारपट्‌टीला उलगडलेले नाही. 

गंभीर दुष्परिणाम
सागरी प्रदुषणाचा जलचर सृष्टीवर खूप मोठा परिणाम होत आहे. शास्त्रज्ञांनी गेल्या काही वर्षात केलेल्या पाहणी सागरी प्रदुषणाचा सागरी पक्षी आणि माशांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. एका अभ्यासानुसार 267 प्रकारच्या प्रजातीवर त्याचे परिणाम दिसले आहे. देवमासे, डॉल्फिन, खेकडे, कोळंबी हे यामुळे जास्त प्रभावीत होतात. जगात दरवर्षी दहा लाख पक्षी केवळ प्रदूषणाचे बळी पडत आहेत. यातील बहुसंख्य अन्न मार्गात प्लास्टीक अडकून मृत पावतात. प्रदूषित पाण्यात पोहोणाऱ्यांना विविध आजार जखडतात. या सगळ्याचा प्रभाव भविष्यात मासेमारीवर होणार आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्‍नही निर्माण होण्याची भिती आहे. 

  • दरवर्षी पृथ्वीवर सागराच्या पोटात फेकला जाणारा कचरा -14 अब्ज पौंड
  • मालवाहू जहाजामुळे निर्माण होणारा कचरा - 5.5 दशलक्ष टन
  • कचऱ्यातील प्लास्टीकचा वाटा - 80 टक्‍के
  • प्रदूषणाने प्रभावीत प्राणी प्रजातींची संख्या - 267
  • जगभरात नदी, समुद्राच्या काठावर राहणाऱ्या लोकवस्तीचे प्रमाण - 90 टक्‍के


जनजागृती हाच यावरचा प्रभावी उपाय आहे. प्रदूषणाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून जागृती करायला हवी. नव्या पिढीने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.
- डॉ. केतन चौधरी,
सागरी पर्यावर अभ्यासक

सिंधुदुर्गात नियमीत सॅम्पलींग होत नाही. मात्र रत्नागिरीत होणाऱ्या पाहणीत या भागात फारसे प्रदूषण नसल्याची बाब स्पष्ट होते. प्लास्टीक कचऱ्याचा प्रश्‍न आहेच. याबाबत रत्नागिरीत आम्ही कारवाईचे पाऊल उचलले आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडायला हवी.
- इंदिरा गायकवाड,
प्रदूषण नियंत्रण महामंडळ, रत्नागिरी

समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छतेची जबाबदारी नेमकी मेरीटाईम, ग्रामपंचायत की पालिकेची हा घोळ आधी सुटायला हवा. अलिकडच्या काळात प्लास्टीक बाटल्या, पिशव्या, बुचे याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यांनीही अलर्ट रहायला हवे. जहाजे समुद्रात मोठ्या प्रमाणात खराब झालेले ऑईल टाकतात. त्यावरही नियंत्रण हवे.
- महेंद्र पराडकर,
सागरी पर्यावरण अभ्यासक, मालवण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com