परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची एसटीला पसंती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

२७४ फेऱ्यांचे आरक्षण सुरू आहे. अशा एकूण ८८१ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी रत्नागिरी एसटी विभागाने जय्यत तयारी केली आहे. आतापर्यंत ३२९ फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून २७८ फेऱ्या ग्रुप बुकिंग केले आहेत. २७४ फेऱ्यांचे आरक्षण सुरू आहे. अशा एकूण ८८१ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. गणपती विसर्जनानंतर परतीसाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दाखवली आहे. दरवर्षी परतीसाठी १६०० हून अधिक गाड्यांचे आरक्षण होते; परंतु यंदा कोरोनामुळे मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

हेही वाचा - कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा..

कोणताही ई - पास लागणार नसल्याने मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी येतील, असा अंदाज होता; परंतु क्वारंटाईनच्या नियमांमुळे चाकरमानी कमी संख्येने रत्नागिरीत आले. एसटीने २९५ गाड्यांतून ४९५६ चाकरमानी रत्नागिरीत आले. लॉकडाउनमुळे मार्च, एप्रिलनंतर गावी आलेले व पुन्हा मुंबईत जाऊ न शकलेले चाकरमानी मोठ्या संख्येने पुन्हा मुंबापुरीत जाण्यास सज्ज झाले आहेत. अर्थात एसटीची लाल परी त्यांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळेच ८८१ हून अधिक गाड्यांचे आरक्षण झाले झाले.

दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. ग्रुप बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली, कोल्हापूर, सातारा आदी जवळच्या विभागांतून जादा गाड्या मागवण्यात आल्या आहेत. सर्व चालक, वाहकांना कोरोनाविषयक नियमांबाबत सूचना देण्यात येत आहेत.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता गणेशोत्सवात दरवर्षी २५०० हून अधिक गाड्यांचे नियोजन केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात १५०० हून अधिक गाड्या येतात. यंदा कोरोनामुळे या गाड्यांची संख्या चार पटीने कमी झाली आहे. २२ प्रवाशांनाच प्रवास करता येणार असल्याने यात घट झाली. जादा वाहतुकीतून एसटीला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा -  जठारांना सल्ला देणार्‍यांनी आपल्या मतदार संघात लक्ष द्यावे...

ग्रुप बुकिंगच्या आगारनिहाय फेऱ्या

मंडणगड - ३५, दापोली - २७, खेड - १३, चिपळूण - २२, गुहागर - ७६, देवरुख - २६, रत्नागिरी - २६, लांजा - १९, राजापूर - ३४. एकूण २७८.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkani people select travel return to mumbai or home by st transport