स्मशानभूमी कुडाळपुरतीच, इतरांना बंदी

अजय सावंत
Thursday, 24 September 2020

ओरोस प्राधिकरण विभागामध्ये असलेल्या आरक्षित भूखंडावरील स्मशानात मृत कोरोना रुग्णांचा अंत्यविधी करणार, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला होता.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - शहरातील मुख्य स्मशानभूमीलगत मोठी वस्ती आहे. या स्मशानभूमीत शहरातील व्यक्‍ती सोडून इतर मृतदेह दहन करण्यास आमचा विरोध राहील, असे येथील नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी पत्रकात म्हटले आहे. ओरोस प्राधिकरण विभागामध्ये असलेल्या आरक्षित भूखंडावरील स्मशानात मृत कोरोना रुग्णांचा अंत्यविधी करणार, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला होता.

या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असल्याने या स्मशानात अंत्यविधी होत असताना परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. यामुळे याठिकाणची स्मशानशेड अन्यत्र हलविण्याची मागणी तेथील स्थानिकांनी केली होती. सोमवारी (ता.21) रात्री तेथे विरोध झाल्याने आता तालुक्‍यातील अशा व्यक्तींचे शव येथील स्मशानभूमीत दहन करावेत, असा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार असल्याची माहिती कानावर येत आहे. कुडाळ मोठ्या लोकवस्तीचे शहर आहे. शहरातील मुख्य स्मशानभूमीलगतही मोठी वस्ती असल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील नागरिक सोडून इतर मृत व्यक्तींचे या स्मशानभूमीत दहन करण्यास विरोध राहील.

याबाबत योग्य निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावा. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला कोरोना काळात नगरपंचायतीने सहकार्य केले आहे, यापुढेही करू; परंतु ज्या गावातील व्यक्ती मृत झाली ते गाव आपल्या गावातील व्यक्तीचे दहन आपल्या गावात करू देत नसेल तर आम्ही का द्यावे? शहरातील नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेत आहोत तरी जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kudal Cemetery issue