कुडाळला एक, अन्‌ सुकळवाडसाठी वेगळा नियम का? 

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 26 July 2020

कोरोना पार्श्‍वभूमीवरील नियम सगळ्यांना समान असल्याचे दिसत नाही. कंटेन्मेंट झोनबाबत सुकळवाड गावासाठी एक नियम आणि कुडाळ शहरासाठी दुसरा (शिथील) नियम हे प्रशासनाचे धोरण योग्य नाही.

मालवण : कोरोना पार्श्‍वभूमीवरील नियम सगळ्यांना समान असल्याचे दिसत नाही. कंटेन्मेंट झोनबाबत सुकळवाड गावासाठी एक नियम आणि कुडाळ शहरासाठी दुसरा (शिथील) नियम हे प्रशासनाचे धोरण योग्य नाही. 14 दिवस संपूर्ण सुकळवाड बाजारपेठ बंद राहिल्याने व्यापारी वर्गाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल भाजप युवा मोर्चा सुकळवाड विभागीय अध्यक्ष चेतन मुसळे यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे. 

प्रशासनाने याबाबत खुलासा न केल्यास सुकळवाड नागरीक, व्यापारी आणि भाजप पदाधिकारी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन तसेच मालवण सभापती, सुकळवाड सरपंच यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे. यावेळी चेतन मुसळे यांच्यासह विक्रम मोरजकर, विशाल वाळके, निखिल नार्वेकर उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, सुकळवाड गावामध्ये एका बाजूला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला. प्रशासनाने कंटेन्मेंट झोन 500 मिटर एवढा करून संपूर्ण सुकळवाड गाव सील केला. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील असलेले सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले. तरीही कंटेन्मेंट झोन असल्याने संपूर्ण बाजारपेठ 14 दिवस बंद राहिली. 

झोन कमी करण्याबाबत प्रशासनास विचारणा केली असता तसे होणार नाही असे सांगण्यात आले. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने या काळात गावातील नागरीक आणि व्यापारी यांचे हाल आणि नुकसान देखील झाले; परंतु प्रशासनाने हे सर्व जनतेच्या सुरक्षेसाठी केले आहे हे समजून घेत आम्ही प्रशासनास सहकार्य केले; परंतु दोन दिवसापूर्वी कुडाळ शहरात स्थानिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले. रुग्ण संख्या 4 ते 5 पोहचली.

एका ठिकाणी 800 मिटर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. व्यापारी बांधवांच्या मागणीनंतर प्रांताधिकारी यांनी 800 मीटर झोन 100 मीटर केला. लागू केलेल्या कंटेन्मेंट झोनची मर्यादा कमी होते तर सुकळवाड गावावर प्रशासनाने अन्याय का केला ? रुग्णाच्या संपर्कातील 
व्यक्तीही निगेटिव्ह आले असताना संपूर्ण सुकळवाड 14 दिवस बंद राहिली. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. 

नुकसानाची भरपाई कोण करणार? 
सुकळवाड किंवा अन्य ठिकाणी जसा नियम लावला गेला तसाच नियम कुडाळ शहराला हवा, अन्यथा सुकळवाड व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करणार?. आम्हाला उत्तर द्या, अन्यथा सुकळवाड नागरीक, व्यापारी आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन आणि निषेध करेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kudal one, why different rules for Andhra Sukalwad?