विधान परिषदेसाठी कुणबी समाजाने सुचविलेत या नेत्यांची नावे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर मतदारसंघातून अविनाश लाड यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत संपली असून, या ठिकाणी आता कोणाची वर्णी लागणार, याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

राजापूर ( रत्नागिरी ) - विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती करताना कोकणातील कुणबी समाजाच्या नेत्यांना प्राधान्याने संधी मिळावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. त्यामध्ये कुणबी समाज नेते अविनाश लाड यांच्यासह रविकांत बावकर यांचे नाव सूचित केले आहे. 

विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर मतदारसंघातून अविनाश लाड यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत संपली असून, या ठिकाणी आता कोणाची वर्णी लागणार, याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशा स्थितीमध्ये राज्याच्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांची गत महिन्यामध्ये मुदत संपली आहे. या रिक्त जागांसाठी आपापली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या घडामोडींमध्ये अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाने राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी कुणबी समाज नेत्यांना संधी देण्याची मागणी सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्ष कॉंग्रेसकडे केली आहे. याबाबतचे पत्र कुणबी संघाचे सचिव विलास पळसमकर यांनी थोरात यांना पाठविले आहे. 

मोठ्या संख्येने असलेल्या कोकणातील कुणबी समाजाने कॉंग्रेसला निवडणुकीमध्ये नेहमीच साथ दिली आहे. मात्र, कुणबी समाजाचे गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिलेले आहेत. विधान परिषदेमध्ये कुणबी समाजाचे प्रश्‍न मांडून सोडविण्यासाठी कुणबी समाज नेत्यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. कुणबी सेवा संघाच्या या मागणीची दखल कॉंग्रेसकडून घेतली जाणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

दोन्ही नेतृत्वांचा प्राधान्याने विचार व्हावा
विधानसभेच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये राजापूर मतदारसंघातून नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांचा काही मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता. कुणबी समाज नेते लाड यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून, त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांनी कोरोनाच्या महामारीमध्येही सर्वसामान्यांना स्वखर्चाने विविध प्रकारची मदत केली आहे. दक्षिण मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचे प्रदेश प्रतिनिधी रविकांत चंद्रकांत बावकर यांनीही चांगली कामगिरी केली आहे. या दोन्ही नेतृत्वांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी पळसमकर यांनी केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunbi Community Suggest Avinash Lad Ravikant Bavkar Name For Legislative Council