नियोजनाचा अभाव, अन् नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

या पावसाचा सर्वाधिक फटका खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या महामार्गालगत असलेल्या रहिवाशांना बसला आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात मंगळवारी (ता.7) झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील नियोजनाचा अभाव स्पष्टपणे पुढे आला आहे. या पडलेल्या पावसाने आलेल्या पाण्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीने केवळ रस्ता उभारणीचे काम केले; मात्र पाणी जाण्याचे सुयोग्य नियोजन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी केली नसल्याचे अधोरेखित झाले. 

यावेळी पावसामुळे महामार्गालगतच्या नागरिकांची झालेली नुकसानी पुन्हा होवू नये, यासाठी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी सुरु असलेले काम पूर्ण होण्यापूर्वीच यात सुधारणा करून घेणे आवश्‍यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्जन्य राजाने मंगळवारी सकाळी अचानक रुद्र रूप धारण केले होते. सुमारे चार तास सातत्याने हा पाऊस कोसळत होता. या पावसाचा सर्वाधिक फटका खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या महामार्गालगत असलेल्या रहिवाशांना बसला आहे.

कारण हायवे नजिकची गावे या पावसाच्या पाण्याने भरून निघाली होती. सदैव की त्यानंतर पाऊस थांबला. नाहीतर हाहाकार माजला असता. महामार्गामुळे ओरोस आणि कसाल गावच्या इतिहासात प्रथमच वस्तीत पाणी घुसले आहे. कसाल असो अथवा ओरोस, दोन्ही गावांना नद्या आहेत; मात्र एवढ्या वर्षात या नदीचे पाणी कधीच वस्तीत शिरले नव्हते. कालच्या पावसात सुद्धा नदीचे पाणी वस्तीत गेले नाही. तर गावातील अन्य पाण्याचे प्रवाह बंद झाल्याने ही आपत्ती निर्माण झाली होती. 

मुंबई ते गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम करताना किमान 80 टक्के रस्ता व उभारण्यात आलेले ब्रिज मातीची भर टाकून उंच करण्यात आले आहेत. त्यामुळे वस्तीपेक्षा जास्त उंच रस्ते झाले आहेत. परिणामी हे पाणी नजिकच्या भागात जाणार आहे. पूर्वी हेच पाणी नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे वाहत होते. त्यामुळे कितीही पाऊस पडला तरी ते पाणी वस्तीत जात नव्हते; परंतु ठेकेदार कंपनीने केवळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे काम केले. त्याला महामार्ग प्राधिकरण विभागाच्या यंत्रणेने साथ केली. येथे पडणारा पाऊस आणि त्यामुळे येणारे पाणी याचा किंचित सुद्धा अभ्यास केलेला नाही. छोटे छोटे असलेले पाण्याचे नाले प्रवाह त्यांनी मातीची भर घालून बदलले; पण हे प्रवाह बदलताना पावसाचे पाणी यातून जाईल का ? याचा अभ्यास केला नाही. 

हायवे चौपदरीकरणमुळे नजिक असलेल्या गावांत पूर्व आणि पश्‍चिम असे स्वतंत्र दोन भाग पडले आहेत. पूर्वेला असलेल्या व्यक्तीला पश्‍चिम भागात येताना वळसा घालून यावे लागते. तीच स्थिती पश्‍चिमेकडून पूर्वेला जाताना आहे. ठेकेदार कंपनीने येथील नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास न करता काम करताना सोइस्कर होईल, अशा पद्धतीत हे प्रवाह बदलले आहेत. ज्या ठिकाणी 2 ते 3 पाईपची गरज होती. अशा मोरीच्या ठिकाणी एकच पाईप घातला आहे. गटारे निकामी आहेत. त्यामुळे 8 जुलैच्या आपत्तीला नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. 

घाटमाथ्याचा अभ्यास केला? 
जिल्ह्यात महामार्गाचे काम करताना ठेकेदार कंपनीने घाटमाथा किंवा अन्य प्रदेशाचा विचार करून केले आहे; मात्र अन्य भागाची व सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक व भौगोलिक स्थिती वेगळी आहे. काम सुरू केल्यानंतर पहिल्याच पावसात याची प्रचिती आली होती. कारण त्या पावसात माती भराव वाहून जाणे किंवा तो खचने असे प्रकार घडले होते. पडणारा पाऊस व त्यामुळे येणारे पुर याचा अभ्यास न करता केवळ पाण्याला मार्ग ठेवण्याचे काम ठेकेदार कंपनीने केले. त्याचेच दुष्परिणाम सध्या दिसत आहेत. 

नुकसानीची मागणी 
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा काल (ता.9) झाली. या सभेत पुरामुळे झालेल्या नुकसानीवर जोरदार चर्चा झाली. यावेळी संबंधित कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गावांत बुधवारी पाणी घुसले, असा गंभीर आरोप रणजीत देसाई यांनी केला. परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. त्यामुळे या नुकसानीचा सर्व्हे करून ठेकेदार कंपनीकडून नुकसानी घेण्यात यावी, असा ठराव रणजित देसाई यांनी घेतला आहे. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of highway work planning konkan sindhudurg