esakal | मोदीमाळ आदिवासीवाडीतील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अभावी खोळंबला विकास
sakal

बोलून बातमी शोधा

raigad

रसायनी येथील पनवेल तालुक्यातील चावणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोदीमाळ आदिवासीवाडीत जाण्यासाठी रस्त्याची मुख्य पायाभूत सुविधा नसल्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांची गैरसोय होत आहे.

मोदीमाळ आदिवासीवाडीतील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अभावी खोळंबला विकास

sakal_logo
By
लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) : रसायनी येथील पनवेल तालुक्यातील चावणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोदीमाळ आदिवासीवाडीत जाण्यासाठी रस्त्याची मुख्य पायाभूत सुविधा नसल्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच एक ओढा ओलांडताना पावसाळ्यात ओढ्याला मोठा पूर आल्यावर वाडीतील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटत आहे. तर काही जण महत्त्वाच्या कामांसाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून येत असल्याने दुर्घटनेची भिती ग्रामस्थ व्यक्त करत आहे. रस्त्याची मुख्य आणि इतर पायाभूत सुविधापासून वंचित असल्याने वाडीचा विकास खोळंबला आहे, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

माणिक गडाच्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी मोदीमाळ आदिवासीवाडी बामणोली धरणा जवळ वसलेली आहे. या आदिवासी वाडीत सुमारे चाळीस घरे आहेत. वाडीतील नागरिकांना पनवेल मोहोपाड्याकडे जाताना सवने येथे एस टी बस किंवा रिक्षासाठी चढ उतार करावी लागते. जाताना एक सव्वा किलो मीटर अंतराचा रस्ता आहे. तसेच वाडी जवळचा ओढा ओलांडून जावे लागते. मातीचा कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात चिखल होतो, असे सांगण्यात आले.  त्यामुळे जाताना खूप हाल होत आहे. तसेच ओढ्याला मोठा पूर आल्यावर वाडीतील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

पनवेल, मोहोपाडाकडे जाताना बामणोली धरणावरून जांभिवली येथून लांबच्या रस्त्यानी जाता येत आहे. मात्र या रस्त्याने जाताना हाल होतात. त्यामुळे काहीजण जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून येत असल्याने दुर्घटनेची भिती नागरिक व्यक्त करत आहे. पावसाळ्यात कुणी आजारी पडले तर डोलीत बसून  सवने येथे पक्या सडकापर्यंत घेऊन जावे लागते असे सांगण्यात आले. पावसाळ्यात वाडीतील आम्ही लोक मळे लावतो. भाजी विकण्यासाठी वासांबे मोहोपाडा येथे घेऊन जावे लागते.

ओढ्याला भरपूर पाणी असले तर जाता येत नाही. धरणावरून जांभिवली येथून जाता येते, मात्र जांभिवलीपर्यंत डोक्यावर ओझे घेऊन  तीन किलो मीटर खाच खळग्याच्या रस्त्यावरून तंगड्या तुडवत जावे लागते, असे सिंधू नाग्या वाघ या ग्रामस्थ महिलाने सांगितले. तसेच वाडीतील ग्रामस्थांनी दगड अणि लाकड वापरून पुल बांधले होते. दोन वेळा मुसळधार पावसात ओढ्याला आलेल्या पूरात पुल वाहून गेले असे सांगण्यात आले. तर शासनकडून  वाडीत जाण्यासाठी ओढ्यावर पुल किंवा साकव बांधून रस्ता, विज आदी सुविधा मिळाव्यात, अशी मागणी राघो जानू वाघ, हरिचंद्र अनंता निरगुडा आणि इतर आदिवासी बांधवांनी केली आहे. 

उरण मतदार संघाचे आमदार महेश बादली म्हणाले, मोदीमाळ आदिवासीवाडीचा रस्ता झाला पाहिजे, त्याला वन विभागाची परवानगी मिळावी, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परवानगी नंतर रस्त्याचे काम केले जाईल. तसेच या वाडीतील इतर समस्या सोडविणे आणि इतर आदिवासीवाड्यांचे रस्ते आणि इतर समस्या सोडविणे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले