वेळागरमध्ये जमीन मोजणी रोखली 

दीपेश परब
Thursday, 4 March 2021

शासनाचे अधिकारी आमच्याशी चर्चा करून समस्या सोडवत नाहीत, तोपर्यंत जमीन मोजणीला सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - शिरोडा-वेळागर येथील सर्व्हे क्रमांक 29 पासून ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा जमीन मोजणीचा कार्यक्रम दडपशाहीने शासन करत असल्याचा आरोप करत आज येथील वेळागर भूमिपुत्र संघाने (शिरोडा) जमीन मोजणी रोखली. शासनाचे अधिकारी आमच्याशी चर्चा करून समस्या सोडवत नाहीत, तोपर्यंत जमीन मोजणीला सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

गेली पंचवीस वर्ष पर्यटन विकास महामंडळाने शिरोडा-वेळागर येथील जमिनी ताज प्रकल्पाच्या नावावर ताब्यात घेतल्या; मात्र अद्यापपर्यंत येथे काहीही न केल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. सर्वे नंबर 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36 आणि 212 व 213 (एकूण क्षेत्र 41.63 हेक्‍टर) हे शासनाला हवे आहे; मात्र जमिनी घेतल्यापासून अद्याप येथे काहीही न केल्यामुळे भूमिपुत्रांनी या जमिनी आम्हाला परत कराव्यात, अशी मागणी केली आहे.

उच्च न्यायालयात याप्रकरणी भूमिपुत्र संघाने याचीकाही दाखल केली असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तरीही भूमिपुत्र संघ आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागत आहे; परंतु शासन याबाबत भूमिपुत्रांशी कोणतीही बोलणी न करता येथे शेतकऱ्यांचे नुकसान करून प्रकल्प आणू पाहत आहेत, असाही आरोप स्थानिकांनी केला. 

महाराष्ट्र शासन भूमिअभिलेख विभागाचे उपाधिक्षक यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकरिता दीपक भुपल यांच्या नावे जमीन मोजणीबाबत नोटीस काढून त्याच्या प्रती या सर्वेमधील शेतकऱ्यांना सोमवारी (ता.1) पाठविल्या होत्या. विशेष म्हणजे ही जमीन मोजणी आज करायची असताना त्याबाबत नोटीस या शेतकऱ्यांना काल (ता.2) मिळाल्या आहेत.

यावरून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून दडपशाहीने शासनाला हा प्रकल्प उभा करायचा आहे, असे स्पष्ट होत आहे; परंतु समस्या सोडण्याबाबत शेतकऱ्यांबरोबर अधिकारी चर्चा करत नाहीत, तोपर्यंत या जमीन मोजणीला कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संघाचे अध्यक्ष भाई रेडकर यांनी दिला आहे. याबाबत याठिकाणी पंचयादीही घालण्यात आली. 

यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ग्रामपंचात सदस्य प्राची नाईक, खजिनदार जगन्नाथ डोंगरे, सचिव प्रदीप आरोसकर, खजिनदार जगन्नाथ डोंगरे, संघाचे सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: land census opposing velagar konkan sindhudurg