सिंधुदुर्गातील वर्दळीचा करूळ घाट धोकादायक

सिंधुदुर्गातील वर्दळीचा करूळ घाट धोकादायक

पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या जवळपास सगळ्याच घाटांचे दुर्दैवाचे दशावतार संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुळात सिंधुदुर्गात उतरणारे बहुसंख्य घाट बांधताना लक्षात घेतलेली वाहतूक क्षमता आजच्या तुलनेत कमी आहे. यामुळे अतिरिक्त ताणाबरोबरच नैसर्गिक आपत्तीचा फटकाही या घाटांना बसतो. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वच घाटमार्गांना तडाखा बसला. यानंतर घाटमार्गांच्या झालेल्या स्थितीचे केलेले हे ऑडिट...

वैभववाडी - कोसळत असलेल्या दरडी, रस्ता खचण्याच्या प्रकारात होणारी वाढ आणि त्या तुलनेत बांधकाम विभागाकडून न होणाऱ्या ठोस उपाययोजना यामुळे सर्वाधिक वाहतूक असलेला करूळ घाट दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालला आहे. पावसाळ्यात आतापर्यंत पाचपेक्षा अधिकदा करूळ घाटात दरडी कोसळल्या आहेत. अशा घटना दरवर्षी घडत असताना गेल्या काही वर्षात दरडी कोसळणे रोखण्यासाठीच्या ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत, ही शोकांतिका आहे.

तळेरे - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट हा ९.६ किलोमीटर लांबीचा आहे. या घाटरस्त्याने दररोज ३२ हजार मेट्रीक टन वाहतूक होते. हा घाट रस्ता नागमोडी वळणाचा असला तरी यालाच वाहनचालक अधिक पसंती देतात; मात्र सर्वाधिक वाहतूक असलेला हा घाटरस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे या पावसाळ्यात झालेल्या पडझडीने स्पष्ट झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच ते सहा वेळा करूळ घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. तर घाटरस्ता खचण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. एकीकडे दोन हजार फूट खोल दरी आणि दुसरीकडे कधीही कोसळतील अशा दरडी, असा दुहेरी धोका या घाटरस्त्याला आहे.

या घाटरस्त्याला दरडीचा धोका असला तरी गेल्या काही वर्षांत दरडी रोखण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाने कोणतेही पाऊल उचलले नाही. काही वर्षांपूर्वी दरडी रोखण्यासाठी बोल्डरनेटचा वापर करण्यात आला होता. 

तेथे दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी झाले होते; परंतु त्यानंतर तशा पद्धतीची उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे घाटात सातत्याने दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत. या घाटरस्त्यालगत खोल दरी आहे. ही दरी दोन हजार फुटापेक्षा अधिक आहे. असे असले तरी या रस्त्याकडेची सुमारे साठ ठिकाणे आजही रामभरोसे आहेत. वाहन अडेल अशी कोणतीही उपाय योजना त्या ठिकाणी नाही.

क्रॅश बॅरियर्स आणि गॅबियन पद्धतीचे बांधकाम घाटात उपयुक्त ठरले आहे; परंतु या तंत्रज्ञानाचा आता बांधकाम विभागाला विसर पडला आहे. गेल्यावर्षी या घाटात दीड कोटींपेक्षा अधिक निधीची कामे झाली आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. तर काही अजूनही सुरू झालेली नाहीत. ही कामे न होण्याची कारणही गुलदस्त्यात आहे. करूळ हा सर्वाधिक महत्त्वाचा घाट आहे. करूळ हा सर्वाधिक वाहतूक असलेला घाटरस्ता असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम विभागाने या घाटरस्ता वाहतुकीकडे बांधकाम विभागाने अधिक गांर्भीयाने पाहण्याची गरज आहे.

बोल्डरनेट वापराची गरज
करूळ घाटात दरडी कोसळतील अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यातील सहा सात ठिकाणे अतिशय धोकादायक आहेत. तेथे बोल्डरनेटचा वापर करणे आवश्‍यक आहे. याशिवाय यापूर्वी लावण्यात आलेल्या बोल्डरनेटची किरकोळ दुरुस्ती करणेही गरजेचे आहे.

भगदाडांची हवी दुरुस्ती
करूळ घाटात रस्त्याकडेला किरकोळ स्वरूपातील भगदाडे आहेत. पावसाळ्यात या भगदाडांमध्ये पाणी जाऊन ती अधिकच मोठी होतात. त्यानंतर रस्ता खचण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे अशा स्वरूपाच्या भगदाडाची किरकोळ असतानाच बांधणी केली तर रस्ता खचण्याचे प्रकार कमी होतील आणि पुनर्बांधणीवर होणारा कोट्यवधीचा खर्च ही कमी होऊ शकेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com