शिरशिंगे येथे डोंगररस्ता खचला; 20 कुटुंबांचे स्थलांतर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सावंतवाडी - शिरशिंगे गोठवेवाडी येथे भूस्खलन झाले आहे. याची तीव्रता वाढण्याची भीती आहे. येथे गोठवेवाडीच्या वरील बाजूस असलेला डोंगर व रस्ता खचल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे सुमारे 25 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

सावंतवाडी - शिरशिंगे गोठवेवाडी येथे भूस्खलन झाले आहे. याची तीव्रता वाढण्याची भीती आहे. येथे गोठवेवाडीच्या वरील बाजूस असलेला डोंगर व रस्ता खचल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे सुमारे 25 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

सह्याद्रीच्या कुशीत असलेला शिरशिंगे गोठवेवाडी हा भाग मनोहर संतोष गडाच्या पायथ्याशी वसलेला आहे. येथे असलेल्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर तेथील स्थानिकांनी आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व इतर आपत्कालीन यंत्रणेने धोकादायक कक्षेत असलेल्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले; मात्र अजूनही धोका कायम आहे. 

तीन-चार दिवसापांसून कोसळणाऱ्या पावसाचा शिरशिंगे गोठवेवाडी भागाला फटका बसला. दोन दिवसांपूर्वी तेथील गोठवेश्‍वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला उभ्या भेगा पडल्या होत्या; मात्र या भेगा कमी असल्याने ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री या भेगा मोठ्या प्रमाणात रुंदावत गेल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली. तेथे वस्तीला लागून असलेल्या डोंगरालाही भेगा गेल्याने माळीणची पुनरावृत्ती होण्याच्या शक्‍यतेने ग्रामस्थांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला. 

याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सर्व पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने तेथील सुमारे 25 कुटुंबीयांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. या कामात स्थानिकांनीही सहभाग घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हा सदस्य पल्लवी राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सभापती पंकज पेडणेकर आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. उशिरापर्यंत अनेकांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले होते. 

""मोठ्या प्रमाणात रस्ता खचला आहे. रस्ता उंचवठ्यावर असून खाली वस्ती आहे. शिवाय वस्तीच्या वर व खाली घरांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.'' 
- राजाराम म्हात्रे,
तहसीलदार, सावंतवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land slice in Shirshinge 20 families migration